स्पष्टता न झाल्यास समुपदेशनावर बहिष्कार टाकण्याचा संघटनेचा इशारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिपत्याखालील हिवताप विभागातील गट 'क' संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सन २०२६-२७ च्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष पवार यांनी केला आहे. याबाबत संघटनेने मा. संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
*अनियमिततेचे प्रमुख मुद्दे :*
*१)* शासन निर्णयानुसार दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत हिवताप विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर झालेली नाही.
*२)* रिक्त पदांचा तपशील, परिमंडळनिहाय ज्येष्ठता यादी व बिंदूनामावली प्रसिद्ध केलेली नाही.
*३)* अवघड व बिगर अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची स्वतंत्र यादी जाहीर केलेली नाही. पेसा अंतर्गत पदांबाबत स्पष्टता नाही.
*४)* विनंती बदल्यांचे आदेश सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात काढायचे असताना दि. १४ मे पर्यंत आदेश काढणे सुरूच आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी विकल्प दिलेल्या जागांवरही विनंती बदल्या झाल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
*नियुक्ती प्राधिकाऱ्याबाबत संभ्रम :*
दि. १६/०२/२०२४ च्या शासन निर्णयानुसार गट 'क' चे नियुक्ती प्राधिकारी विभागीय उपसंचालक होते. मात्र मा. राज्यमंत्री महोदयांच्या दि. ०८/०४/२०२६ रोजीच्या बैठकीत सदर निर्णय रद्द करण्याचे ठरले. नवीन नियुक्ती प्राधिकारी ठरलेले नसल्याने बदलीचे अधिकार कोणाकडे आहेत याबाबत अनिश्चितता आहे.
*बदल्या रद्द करण्याची प्रमुख कारणे :*
*१)* यावर्षी जनगणना सुरू असल्याने बदल्या रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे.
*२)* पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशावर युद्धाचे संकट असल्याने मा. पंतप्रधानांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
*३)* नियुक्ती प्राधिकारी ठरलेले नसल्याने सेवाविषयक गुंतागुंत निर्माण झाली आहे.
संघटनेने म्हटले आहे की, ही संघटना नोंदणीकृत व शासनमान्य संघटनेशी संलग्न असूनही बदली प्रक्रिया राबविताना विश्वासात घेतलेले नाही. *दि. १५/०५/२०२६ पूर्वी स्पष्टता न झाल्यास बदलीपात्र कर्मचारी समुपदेशनावर बहिष्कार टाकतील*, असा इशारा संघटनेने दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मा. प्रधान सचिव, मा. सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई व मा. आयुक्त, आरोग्य सेवा यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


0 टिप्पण्या