Ticker

6/recent/ticker-posts

नवनित विद्यालयातील माजी विद्यार्थीनींची सीआरपीएफ मध्ये निवड

      
चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा  :-दि. १७ जानेवारी २०२६ :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खमारी (बुज.) हे गाव सूर नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. सुमारे ३००० लोकसंख्येच्या गावातील प्राथमिक व्यवसाय प्रामुख्याने शेती हा आहे. या खेडेगावात बहुतांश शेतकरी, शेतमजूर वर्ग आहे. मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा द्वारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा या शाळेतील माजी विद्यार्थींनी जमूना जयदेव अटराये ची केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नुकतीच निवड झाली. त्याबद्दल शाळेत अभिनंदनपर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. गावातील याच शाळेतून वर्ग ८ ते १२ वी (कला) पर्यंतचे तिचे शिक्षण झाले आहे. तिने स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण तयारी तक्षशिला करिअर अकॅडमी खमारी (बुज.) येथून केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी मिळावी, अशी बहुतांश तरुण-तरुणींची इच्छा असते. तिची इच्छा पुर्ण झाल्यामुळे गावात व परिसरात अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. 
      केंद्रीय राखीव पोलीस दल हे आपल्या देशातील राखीव सशस्त्र पोलीस दल असून भारत सरकारचे सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. कायदा  सुव्यवस्था राखण्यासाठी व बंडखोरी रोखण्यासाठी राज्य केंद्रशासित प्रदेशांना पोलिसांच्या कार्यात मदत करते तसेच देशांतर्गत सुरक्षा, निवडणुका आणि इतर महत्त्वपूर्ण कामांसाठी तैनात केले जाते. तिला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दलचा अभिमान आहे.
           प्रथम मला अपयश आले परंतु अपयशामुळे खचून न जाता पुन्हा तयारी करू लागली. आवश्यक अभ्यास करत होती. कठोर प्रयत्नांमुळेच मला यश मिळाले. त्यामुळेच माझी निवड सीआरपीएफ मध्ये झाली. माझ्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षकांना देते, असे मनोगत जमूना अटराये या विद्यार्थीनींने व्यक्त केले. त्यावेळेस तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. 
            मुख्याध्यापक नरेंद्र गणविर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून सांगितले की, अपयशामुळेच यश संपादन करता येते. कठोर परिश्रमामुळे यशाची पायरी गाठता येते. या विद्यार्थीनींचे अनुकरण करावे, तिच्याकडून प्रेरणा घ्यावी व आपले भविष्य उज्ज्वल करावे. तिने गावाचे, शाळेचे, आईवडीलांचे नाव उज्ज्वल केले आहे.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, प्रमुख उपस्थितीत संस्था सचिव हिरालाल गजभिये, तक्षशिला कॅरिअर अकॅडेमी खमारी (बुज.) चे संचालक तथा मार्गदर्शक धर्मेंद्र दमाहे, मार्गदर्शक महेंद्र हरदे, मार्गदर्शक मुकेश हरदे, माजी विद्यार्थ्यांनी जमूना अटराये, सुनिल नागदिवे, निर्मला रंगारी, प्रा. अरूण कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सहकार्य अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, कैलास मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नानाजी गजभिये व आभार प्रा. दिनदयाल दमाहे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या