२७ जानेवारीपासून आमरण उपोषण.
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर -शासनाकडून मिळणाऱ्या अतिवृष्टी मदतीपासून तलाठ्याच्या जाणीवपूर्वक हलगर्जीपणामुळे वंचित राहिलेल्या एका हताश शेतकऱ्याने आता न्यायासाठी टोकाचे पाऊल उचलले आहे. माहूर तालुक्यातील गुंडवळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर किसन जाधव यांनी येत्या २७ जानेवारी २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
ज्ञानेश्वर जाधव यांची गुंडवळ शिवारात गट क्र. १ आणि गट क्र. १५ मध्ये वडिलोपार्जित शेती आहे. गेल्या दोन वर्षांपासून (सन २०२४-२५ आणि २०२५-२६) अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर माहूर तालुक्यात 9 वेळा अतिवृष्टी झाली.शेतकरी पूर्णपणे खचला असल्याने शासनाने या नुकसानीची भरपाई म्हणून अनुदान मंजूर केले, मात्र रुई सज्जाच्या तलाठ्याने जाणीवपूर्वक कागदपत्रांत आणि प्रक्रियेत खोडा घातल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
शेतकऱ्याने दिलेल्या निवेदनानुसार, त्यांचे वडील किसन जाधव (मयत) यांच्या नावे असलेली जमीन ते कसत आहेत. सर्व कायदेशीर वारसांचे संमतीपत्र आणि आवश्यक कागदपत्रे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर देऊनही, तलाठ्याने 'व्हीकेसी' (VKC) नंबर देण्यास जाणीवपूर्वक उशीर केला. यामुळे वेळेत 'केवायसी' (KYC) होऊ शकली नाही. तसेच हक्काचे अनुदान ज्ञानेश्वर जाधव यांच्या खात्यात जमा न होता दुसऱ्याच्या खात्यात वर्ग केले.
मी वारंवार तलाठीकडे पाठपुरावा केला, पण त्यांनी प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन मला मानसिक त्रास दिला. वर्ष 2024 चे अनुदान दुसऱ्याच्या खात्यावर गेल्याने मी आणि माझा सरपंच असलेला भाऊ वारंवार भेटून चूक दुरुस्त करण्याविषयी विनंती केली.ते तर मिळवून दिलेच नाही पण 2025 चे अनुदानही जाणून बुजून पुन्हा दुसऱ्याच्या खात्यावर पाठवल्याने व्यथित होऊन उपोषण करत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.त्रास देण्याच्या आणि नुकसान करण्याच्या हेतूने माझ्या हक्काचे पैसे मला देत नसतील, तर मी गप्प बसणार नाही."असे
ज्ञानेश्वर किसन जाधव (पीडित शेतकरी) यांचे म्हणणे आहे.
वारंवार विनंती करूनही,कागदपत्रांची पूर्तता करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने, ज्ञानेश्वर जाधव यांनी आता थेट तहसीलदारांना निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की,
१. दोन वर्षांचे प्रलंबित अतिवृष्टी अनुदान तात्काळ खात्यात जमा व्हावे.
२. जाणीवपूर्वक अन्याय करणाऱ्या रुई सज्जाच्या तलाठी यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.
जर २७ जानेवारी पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तहसील कार्यालयासमोर 'बेमुदत उपोषण' सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनालाही पाठवण्यात आल्या आहेत. सरपंच आर्थिक हितसंबंधांच्या आड आल्याने त्यांच्या भावाला आडव्या हाताने घेतले असल्याची चर्चा आहे.
आता या प्रकरणाकडे महसूल प्रशासन कसे पाहते, तलाठ्यावर कारवाई आणि एका सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळतो का? की, वाचवा वाचवी होते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पण शेतऱ्यांप्रती संवेदनशील असलेले धडाडीचे तहसीलदार अभिजीत जगताप नक्कीच न्याय देतील हा विश्वास आहे.


0 टिप्पण्या