चित्रा न्युज प्रतिनिधी
धाराशिव :-जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. काकानेच पुतण्याचा चाकूने भोसकून खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत पुतण्याचे नाव सुजित ज्ञानेश्वर शेळके (एकुलता एक मुलगा) असे असून, आरोपी काका विलास शिवाजी शेळके याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके हा आपल्या आई-वडिलांशी जमिनीच्या वादावरून सतत भांडण करत होता. यावेळी तो त्यांना मारहाण करत असल्याचे पाहून पुतण्या सुजित हा आजी-आजोबांना वाचवण्यासाठी मध्ये पडला. याच वेळी “तुला जमीन देणार नाही, तू खूप माजलास” अशी धमकी देत संतप्त काकाने सुजितवर चाकूने वार केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजितचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृताची आई मनीषा शेळके यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सहायक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर व पोलिस उपनिरीक्षक चोपणे हे अधिक तपास करत आहेत.


0 टिप्पण्या