Ticker

6/recent/ticker-posts

अखेर फुटलेल्या तलाव पाळीची नाव लागली किनाऱ्याला

          
४ करोड १ लक्ष रुपयांचा निधी मंजूर 


रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
 साकोली:- साकोली येथील गतवर्षी पावसाळ्यात फुटलेल्या तलाव पाळीच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे. याकरिता आमदार नाना पटोले यांच्या अथक प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती असून या कामासाठी ४ करोड १ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. आता हे काम केव्हा सुरू होणार याकडे मासेमारी बांधवांचे लक्ष लागले आहे." श्रेय वर्चस्वाच्या पाण्यात अडकली फुटलेली तलावाची पाळ " या मथळ्याखाली सणसणीत वृत्त प्रकाशित केलेले होते. या वृत्ताची दखल घेऊन आमदार नाना पटोले मुंबईत असल्याने त्यांनी मंत्रालयात बैठक लावून शासनाकडून हा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे फुटलेल्या तलाव पाळीच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून आता या कामाला प्रारंभ केव्हा होणार ? याकडे सर्व मासेमारी बांधवांचे लक्ष लागलेले आहे. कारण पावसाळा तोंडावर आहे आणि जून महिन्यापासून मृग नक्षत्राला प्रारंभ होत आहे. राजकारणाच्या क्षेत्रात जाऊन राजकारण करण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण असे सूत्र ठरलेले असते. त्यानुसार प्रत्येक राजकारणी आपापल्या पद्धतीने आपापली राजकीय पोळी भाजून घेत असतात. परंतु  साकोली तालुक्यातील राजकारणाचा आरसा बघता हे राजकारण आहे की गचकरण असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला होता. वर्ष उलटूनही आणि पावसाळा तोंडावर आला असतांनाही तलावाची पाळ बांधून झाली नसल्याने साकोली-सेंदूरवाफा तालुक्यातील मासेमारी बांधव चांगलेच संतापलेले होते. राजकारण करा नाहीतर गचकरण करा आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. मागील वर्षी फुटलेल्या तलाव पाळीचे बांधकाम त्वरित सुरू करावे अन्यथा आम्हा मासेमारी बांधवांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा दम मासेमारी बांधवांनी राजकारणी नेत्यांनाच दिलेला होता. तलाव पाळ फुटल्यानंतर ज्या ज्या नेत्यांनी फोटोसेशन करून प्रसिद्धी माध्यमांसमोर आपले चेहरे दाखविले त्यांनी हिम्मत असेल तर आता तलाव पाळीवर पाय ठेवून दाखवावे अशा प्रकारचाआक्रोश  मासेमारी बांधवांच्या वदनातून निघाला होता. दरवर्षी तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय राहत असल्याने परिसरात कुपनलिका, विहीर, घरगुती बोअरवेला पाण्याची पातळी तग धरून राहत होती. गतवर्षी मात्र पाळ फुटली आणि तलावातील पाणी पूर्णपणे वाहून गेले होते. त्याबरोबरच लक्षवधी रुपयाचे मासोळीचे बीज वाहून गेले. तात्पुरते फुटलेल्या तलाव पाळीचे बांधकाम करून उन्हाळ्यात मजबूत पाळीचे बांधकाम करण्यात येईल असे आश्वासन सर्वच राजकीय नेत्यांनी त्यावेळी दिलेले होते. तलाव पाळीचे मजबूत बांधकाम करण्यास अडचण जाऊ नये म्हणून तलावातील पाणीसुद्धा पूर्णपणे वाहू देण्यात आले होते. जेणेकरून बांधकामास अडचण जाऊ नये. त्याचा परिणाम असा झाला की तलावात पाणी नसल्याने तलाव परिसरातील बोरवेल, कुपनलिका, विहीर कोरड्या पडल्या. पाण्याची पातळी घसरल्याने शेवटी या परिसरातील नागरिकांना रोज टँकरने पाणी पुरविरण्यात येत आहे. तलाव पाळीचे बांधकाम करण्याचा निधी उपलब्ध झालेला नसल्याने या मागणी करिता सर्वच राजकीय पक्षाकडून निवेदने देण्यात आले होते. पावसाळा तोंडावर आला असतांना सुद्धा फुटलेल्या तलाव पाळीचा प्रश्न मार्गी न लागल्याने मासेमारी बांधवांसमोर मासोळी उत्पादन करावे कसे करावे ? असा गहन प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला होता. साकोली शहरातील मध्यभागात राष्ट्रीय महामार्गाला लागून जवळपास ८० ते ९० एकर क्षेत्राचा मालगुजारी तलाव आहे. या तलावात मासेमारी बांधव दरवर्षी पावसाळ्यात मासोळी बीज टाकून दिवाळीनंतर लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. मागील वर्षी ही पाळ अचानक फूटल्याने आणि मासेमारी बांधवांनी टाकलेल्या मासोळीचे बीज वाहून गेल्याने लक्षावधी रुपयाचे नुकसान झाले होते. तलाव पाळ फुटल्याचे हे वृत्त सर्वदूर प्रसिद्धी माध्यमात येताच अनेक राजकीय प्रतिनिधींनी या स्थळाला भेट दिली होती. साकोलीची जलवाहिनी समजला जाणारा मुख्य तलाव ०१ ऑगस्ट २०२५ रोजी कमकुवत झाला असल्याने फुटला होता. यामध्ये मासेमारी बांधव व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. सन २०२५ मध्ये उन्हाळ्यात तलाव खोलीकरण झाले. यावेळी मत्स्यपालन संस्था अध्यक्ष रामचंद्र वलथरे यांनी खोदलेली माती अगोदर पाळीवर टाकून पाळ मजबूत करा असे सांगितले होते. पण काहींनी त्यांचे न ऐकता ती माती खाजगींना लाखों रूपयांमध्ये विकून आपला वैयक्तिक स्वार्थ साधला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या