चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-मराठा आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करून लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील यांच्या प्रकृतीत सतत बिघाड होत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
ही बाब समजताच नांदेड येथील भगवती हॉस्पिटलचे संचालक तथा नांदेड महानगरपालिकेचे सदस्य डॉ. अंकुश देवसरकर यांनी तात्काळ दत्ता पाटील यांना बोलावून घेतले. प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्यांनी दत्ता पाटील यांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी स्वीकारत मोठा दिलासा दिला आहे.
दत्ता पाटील यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत डॉ. देवसरकर यांनी स्वतः पुढाकार घेत आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी डॉ. देवसरकर म्हणाले,
"समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. दत्ता पाटील यांच्या उपचारासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही."
जनतेच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे दत्ता पाटील हे आज शारीरिक व आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. हडसणी सारख्या छोट्याशा गावातून थेट राज्य सरकारला हादरवून सोडणाऱ्या या योद्ध्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
मराठा समाजातील दानशूर नेतेमंडळींनी पुढाकार घेत दत्ता पाटील यांना आर्थिक मदतीचे पाठबळ द्यावे, अशी भावना समाजबांधवांतून व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या