Ticker

6/recent/ticker-posts

रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चे धडकेत इसम जखमी


रेंगेपार/कोहळी जवळची घटना

महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह


कालिदास खोब्रागडे, 
लाखनी :- पोहरा महसूल मंडळातील घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटपाचे दिवशी अवैध रेती तस्करी करणाऱ्या भरधाव अज्ञात ट्रॅक्टरने रस्त्याचे कडेला लघुशंका करणाऱ्या इसमास धडक दिल्याने जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. जखमीचे नाव मुनेश्वर पुंडलिक राऊत(४५) रा. निमगाव असे आहे. पोहरा महसूल मंडळात रेंगेपार/कोहळी गावचा समावेश नसतांना रेती भरलेला ट्रॅक्टर तिथे गेला कसा ? यावरून चुलबंद नदी पात्रातून रेती तस्करी होते म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या प्रकाराने महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव/सडक येथे उपचार करण्यात आले. 
             तालुक्यातून प्रवाहित होणाऱ्या चुलबंद नदीपात्रात अनेक रेती घाट असून रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती तस्करांकडून अधिक दराने रेती विक्री केली जात असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना परवडेनासे झाल्याने घरकुलांचे कामे ठप्प पडल्याची तालुक्यासह जिल्ह्यातून ओरड होत होती. लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब शासनाचे निदर्शनास आणून दिल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती मोफत देण्याची घोषणा करून अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले. 
               लाखनी तालुक्यातून प्रवाहित होणाऱ्या चुलबंद नदी पात्रातील पळसगाव रेती घाटातून घरकुल लाभार्थ्यांना मंडळनिहाय रेती पुरवठा करण्याचा तहसीलदार लाखनी यांनी  जाहीरनामा प्रकाशित केला होता. त्यानुसार बुधवार(ता.२९ एप्रिल) रोजी पोहरा महसूल मंडळातील मानेगाव, सेलोटी, मेंढा, चान्ना, धानला, खुर्शिपार, मलकाझरी, सिपेवाडा, पुरकाबोडी, पोहरा, गडपेंढरी, कनेरी, पेंढरी, डोंगरगाव/न्याहारवाणी, इसापूर, मचारना, मांगली, रेंगोळा, केसलवाडा इत्यादी गावातील घरकुल लाभार्थ्यांना सकाळी ७:०० ते दुपारी १२:०० या कालावधीत ५ ब्रास रेती वाहतूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांची रेती वाहतूक सुरू होती. 
                बुधवार(ता.२९ एप्रिल) रोजी सकाळी १०:०० ते ११:०० वाजता दरम्यान मुनेश्वर राऊत हे विवाह समारंभात जाण्यासाठी आपले दुचाकीने निघाले होते. अचानक त्यांना लघुशंका लागल्याने दुचाकी रस्त्याचे कडेला ठेऊन लघुशंका करीत असताना रेती भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांना धडक दिल्याने डोक्याला मार लागून जखमी झाले. आजुबाजूला उपस्थितांनी त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव/सडक येथे उपचारासाठी नेण्यात आले. रेंगेपार/कोहळी गावाचा समावेश पोहरा महसूल मंडळात नसतांना सुद्धा रेती भरलेला ट्रॅक्टर रेंगेपार/कोहळी वरून जाणे म्हणजेच चुलबंद नदी पात्रातून रेती तस्करी होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे रेती तस्करी होत असल्याचे बाबीस बळ मिळते. यावरून महसूल विभागाचे कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचे मार्गावर आहे. तो अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर कोणता ? याचा महसूल प्रशासनाने शोध घेऊन नियमानुसार कारवाई करणे आवश्यक झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या