Ticker

6/recent/ticker-posts

"महाराष्ट्र युवा शासन पार्टी" या नव्या राष्ट्रीय राजकीय पक्षाची घोषणा.

👉 अन्याय , भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शोषणाच्या विरोधात जन आंदोलने उभे करणार.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : देशातील कष्टकरी कामगार, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षित व उच्चशिक्षित बेरोजगार युवक तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून "महाराष्ट्र युवा शासन पार्टी" या नव्या राष्ट्रीय राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा प्रा. आनंद सर यांनी केली. रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रा. आनंद सर म्हणाले की, हा पक्ष सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी नव्हे, तर अन्यायाविरुद्ध संघर्ष उभा करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. "हर एक अन्याय के खिलाफ हम पहली आवाज बनेंगे" हे पक्षाचे ब्रीदवाक्य असून देशातील कष्टकरी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारला जाईल, असे त्यांनी सांगितले.
देशात वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे शोषण, शिक्षणाचे व्यापारीकरण आणि सामाजिक विषमता यावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. विद्यमान व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकांच्या समस्या अधिक गंभीर होत असल्याचे सांगत, शासन व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
पक्षाच्या माध्यमातून हमीभाव कायदा, शेतमाल प्रक्रिया उद्योग, सिंचन क्रांती, शेतकरी विमा सुरक्षा, ग्रामीण बाजार व्यवस्थेतील सुधारणा, किमान वेतन हमी, कामगार आरोग्य सुरक्षा, महिला कामगार संरक्षण, संघटित कामगार नोंदणी तसेच शिक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणा यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघर्ष करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी आणि युवकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक वाचनालय, डिजिटल शिक्षण केंद्र, संशोधन प्रयोगशाळा व कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित समाजनिर्मिती आणि संविधानिक मूल्यांचे संवर्धन हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
हा पक्ष कोणत्याही जाती, धर्म किंवा विशिष्ट वर्गाचा नसून भारतातील सर्व कष्टकरी, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक आणि संविधाननिष्ठ नागरिकांचा पक्ष असल्याचे प्रा. आनंद सर यांनी नमूद केले. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित नवा भारत घडविण्यासाठी सर्वांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, गुरु नानक, कबीर, महावीर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
"जय संविधान, जय श्रमिक, जय शेतकरी, जय शिक्षण, जय भारत" अशा घोषणांसह पत्रकार परिषदेचा समारोप झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या