Ticker

6/recent/ticker-posts

मातृत्व अभियानांतर्गत अतनुरात अतिजोखमीच्या मातांवर उपचार : गर्भवतींचीही मोफत तपासणी व समुपदेशन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
जळकोट :-जिल्ह्यासह राज्यात माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण घटले असून यामध्ये केंद्र शासनाने सुरू केलेल्या 'प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा' मोठा वाटा आहे. नुकतेच या अभियानाला १० वर्षे पूर्ण झाली असून, या दशकपूर्तीनिमित्त जळकोट तालुक्यातील अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे सर्व २८ गावाअंतर्गत व ५ आरोग्य उपकेंद्रांमध्ये गरोदर मातांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेला १ हजारांहून अधिक गरोदर मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अतनूर केंद्रांतर्गत दि.९ जून ते दि. १३ जून शनिवारी रोजी एकूण २६५ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५७ अतिजोखमीच्या मातांची तपासणी करून उपचार करण्यात आले. तसेच सर्व ४१ मातांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. वरिष्ठ पातळीवरील सूचनांनुसार येथील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यात येत आहेत.
या विशेष मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रैमासिकातील (४ ते ९ महिने) गरोदर महिलांची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान रक्तदाब, वजन, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, लघवी तपासणी तसेच आवश्यकतेनुसार मोफत सोनोग्राफी करण्यात आली. अभियानाचे २०२६ चे घोषवाक्य सुरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत असून त्यानुसार ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक महिन्याच्या ९, १८ व २७ तारखेला हे अभियान राबवले जाते. जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सकलेन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती कोळ्ळे यांनी केले.
यामुळे सुरक्षित माता व सुदृढ बाळ हे उद्दिष्ट साध्य होईल, असेही यांनी सांगितले. या मोहिमेत डॉ.सकलेन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.भक्ती कोळ्ळे, आरोग्य सह्ययिका प्रेमिला म्हेत्रे, आरोग्य सहायक बालाजी सोनटक्के, आरोग्य निरीक्षक शेख सलमान, फार्मसिस्ट गजानन तोंडारे, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी लक्ष्मी मेंढे, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी दीपा मांगीलवार, आरोग्यदुत मानसेवीमित्र बी.जी.शिंदे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या