Ticker

6/recent/ticker-posts

ध्येयवेडी माणसंच इतिहास घडवतात - एसडीपीओ शिवम विसापुरे


सर्वांगीण शिक्षण विद्यालयात 'मी होणार अधिकारी' उपक्रमात प्रतिपादन 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-सध्याचे युग स्पर्धेचे आहे. त्यासाठी आतापासूनच  मेहनत करणे गरजेचे आहे. वेळेचे योग्य नियोजन करून आपले भविष्यातील ध्येय निश्चित करणे,  जबरदस्त इच्छाशक्ती, स्वतःच्या क्षमतेवर ठाम विश्वास, सातत्य, चिकाटी, जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर कृती करणे आणि यश मिळविणे गरजेचे आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. छोटयाश्या अपयशाने खचूनन जाता आत्मपरीक्षण, सिंहावलोकन करून पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि अनेक ध्येयवेड्या थोर पुरुषांची चरित्रे वाचून त्यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे कारण ध्येयवेडी माणसंच इतिहास घडवितात असे प्रतिपादन साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांनी पिंडकेपार येथे केले.
      सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य अमोल हलमारे यांच्या संकल्पनेतून आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी  आयोजित 'मी होणार अधिकारी' या प्रेरणादायी उपक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की विद्यार्थानो तुम्हाला स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे आहे. यासाठी रोज नियमित वर्तमानपत्रे वाचा, रोज रोजनीशी लिहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाईलचा अवास्तव  वापर टाळा. सर्वांगीण शिक्षण विद्यालयात शालेय स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी उपयुक्त अशी  भरपूर पुस्तके आहेत आणि 'मी होणार अधिकारी' यासारखे प्रेरणादायी उपक्रम राबविणारे प्राचार्य आहेत ही तुम्हा सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे त्याचा फायदा घ्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याचवेळी बोर्ड परीक्षेत १० वीत प्रथम येणारी माही खोब्रागडे, १२ वीत अपूर्वा पुरामकर,एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी  पात्र धनश्री कापगते, विज्ञान मेळाव्यात यशस्वी ठरलेली स्वरा भुजाडे, इस्रोला भेट देवून आलेला मनीष गहाणे तसेच स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थाना पारितोषिके देवून गौरविण्यात आले. 
         प्रास्ताविक व आभारप्रदर्शन  प्राचार्य अमोल हलमारे यांनी तर सूत्रसंचालन ताराचंद कापगते यांनी केले. यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक बाळकृष्ण दोनोडे, उपमुख्या. प्रभाकर चांदेवार, शिक्षक सेवकराम बावनकर, पुरुषोत्तम पंधरे,  पुनेश्वर सेलोकर, प्रल्हाद भुते, सविता मारवाडे, ममता उके, शिक्षकेतर कर्मचारी जगन भानारकर आदींनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या