Ticker

6/recent/ticker-posts

महावितरणला शिवसेनेने दिला ‘अल्टिमेट’वीज तोडणी थांबवा : पंपांना सुरळीतपणे वीज पुरवठा करा

 
दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

परभणी : परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील वीज वसूलीच्या नावाखाली वीज तोडणीची मोहिम महावितरण कंपनीने तातडीने थांबवावी, तोडलेले कनेक्शन तात्काळ जोडून द्यावेत, लोडशेडींग बंद करावी, कृषिपंपांना वेळेवर आणि मुबलक वीज पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांना केली.
                    या प्रश्‍नात तातडीने व गांभीर्याने लक्ष घाला, अन्यथा महावितरणच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यात आंदोलनाच्या माध्यमातून रान उठवू, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम व सुरेश ढगे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी दिला.
महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांना शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.01) एक निवेदन सादर केले. त्याद्वारे रब्बी हंगामातील पिकांसाठी जलाशयातून मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो आहे, परंतु वीजेअभावी शेतकरी पिकांना पाणी देवू शकत नाहीत, असे चित्र आहे, त्यामुळे सोडलेल्या पाण्याचा उपयोगच होत नाही, अशी खंत या शिष्टमंडळाने व्यक्त केली. ग्रामीण भागात रोज 12 ते 16 तास वीजेचे भारनियमन सुरु आहे. ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नवीन डिपी व वीजेचे साहित्य मिळत नाही. या स्थितीत सुध्दा महावितरणचे अभियंते थकबाकी वसूलीच्या नावाखाली वीज तोडणीची मोहिम युध्द पातळीवर राबवित आहेत, अशी खंत या शिष्टमंडळाने व्यक्त केली.
                     निवेदनावर अतूल सरोदे, संजय सारणीकर, गंगाप्रसाद आनेराव, संजय गाडगे, अशोक वाघ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या