• लाखनी सहवनक्षेत्रातील प्रकार
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- वन परिक्षेत्र लाखनी मोठ्या झाडांचा पुरातन वनक्षेत्र म्हणून ख्यातीप्राप्त असून यात हिंस्त्र श्र्वापदांसह तृणभक्षी प्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास असून वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) जात असल्यामुळे हिंस्त्र श्र्वापदांसह तृणभक्षी प्राण्यांचे अनेक अपघात झाले असले तरी वन विभागाने मात्र कसलीही उपाययोजना केली नसल्यामुळे अपघातामुळे अकारण वन्य प्राण्यांचा जीव जाते. रविवारी सकाळचे सुमारास डोंगरवार पेट्रोल पंप लाखनी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना रानडुक्कराचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. या बाबद स्थानिक क्षेत्र सहाय्यक व वनरक्षकास माहिती करिता अनेकदा भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने वन कर्मचाऱ्यांचे कार्यप्रणालीबाबद शंका निर्माण होत आहे.
माजी आमदार सेवक वाघाये यांचे प्रयत्नाने साकोली वनक्षेत्राचे विभाजन करून लाखनी वन परिक्षेत्राचे निर्मिती करण्यात आली. यात लाखनी, उमरझरी व जांभळी/सडक हे ३ सहवनक्षेत्र असून १३ वनरक्षक बीट आहेत. लाखनी वन परिक्षेत्र मोठ्या झाडाचे पुरातन वनक्षेत्र म्हणून ख्यातीप्राप्त असल्याने यात वाघ, बिबट, अस्वल, लांडगे, कोल्हा इत्यादी हिंस्त्र श्वापदे तर हरीण, सांबर, घोडेनील, ससा, रानगवे हे तृणभक्षी प्राणी आणि घोरपड, साप, विंचू, सरडा हे सरपटणारे प्राणी. तसेच रंगीबेरंगी फुलपाखरे या शिवाय साग, बिजा, साजा हे इमारती लाकूड. जांभूळ, आंबा, बोर, सिताफळ ही फळझाडे, या शिवाय आवळा, बेल, बेहळा, बिब्बा, कवठ या सारखी औषधी वनस्पती या वनक्षेत्राचे वैभव आहे.
या वनक्षेत्राचे संरक्षणाची जबाबदारी वन परिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक व स्थायी, अस्थायी वनमजुरांवर सोपविण्यात आली आहे. मनुष्यबळाअभावी यिव्या रीतीने वनक्षेत्राचे रक्षण होत नसल्यामुळे वन तस्करांना उदय झाला असून मौल्यवान वृक्षांची कत्तल केली जात असल्यामुळे वनक्षेत्र विरळ होण्याचे मार्गावर आहे. या वनक्षेत्रातील लाखनी व जांभळी/सडक सहवनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) गेला असल्यामुळे रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. रात्रीचे सुमारास भक्षाचे अथवा पाण्याचे शोधार्थ निघालेल्या हिंस्त्र अथवा तृणभक्षी प्रण्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनेक बिबट, रानडुक्कर व हरिणांचा मृत्यू झाला असला तरी वन विभागाकडून कसल्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे अपघाताने नाहक वन्यजीवांचा मृत्यू होत आहे. या बाबद स्थानिक वन कर्मचाऱ्यांकडून माहिती लपविण्यात येत आहे.
सहवनक्षेत्र लाखनी येथील गणेश सर्वो सेंटर ह्या पेट्रोल पंपासमोरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळचे सुमारास अज्ञात वाहनाचे धडकेत एका अंदाजे २ क्विंटल वजन असलेल्या रानडुक्कराचा मृत्यू झाला. स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी सर्व सोपस्कार आटोपून शवविच्छेदन केले. तथा रानडुक्कराचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. या बाबद माहिती घेण्याकरिता क्षेत्र सहाय्यक व वनरक्षकास भ्रमणध्वनीवरून अनेकदा संपर्क केला. पण स्थानिक वन कर्मचाऱ्यांकडून रानडुक्कर अपघात मृत्यू प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ करून शेवटपर्यंत दिली गेली नाही. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबद संभ्रम निर्माण होत आहे. घडलेल्या घटनेची माहिती वन कर्मचाऱ्यांकडून का दडविली जाते ? हे कळण्यास मार्ग नाही. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी लाखनी सहवनक्षेत्रातील रानडुक्कर अपघात प्रकरणाची चौकशी करून सत्यता बाहेर आणणे आवश्यक झाले आहे.


0 टिप्पण्या