चित्रा न्युज ब्युरो
छत्रपती संभाजीनगर:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजील मोबाईल अॅपवर किंवा १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरीक cVIGIL अॅपद्वारे तसेच १९५० या टोल फ्रि क्रमांकावर फोन करुन तक्रारी दाखल करु शकतात. क्षेत्रिय पथकाद्वारे प्राप्त तक्रारींची शहानिशा करुन तक्रार १०० मिनिटात निकाली काढण्यात येते. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहायही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. बंदुक/पिस्तुल प्रदर्शन करणे, दारु वाटप, पैसे वाटप, सरकारी मालमत्तेचे विद्रुपन, बनावट बातमी, मतदारांची वाहतुक, भेटवस्तू वाटप, पेड न्यूज, जातीत तेढ निर्माण करणारे भाषण, धमकी इत्यादी प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिक अशा घटनांचे cVIGIL अॅपद्वारे फोटो, व्हिडीओ तसेच ऑडिओ रेकॉर्ड करुन ऑनलाईन तक्रारी दाखल करु शकतात. नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
०००००
0 टिप्पण्या