चित्रा न्युज ब्युरो
पुणे : मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, मतदारांची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने मतदारांना आवाहन करण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघाअंतर्गत सदिच्छादूत म्हणून कवी संदिप खरे आणि प्रवीण रमेश पाखरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्येम सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक प्रशासनाच्यावतीने स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध भागात कार्यक्रम राबविण्यात येत आहे. लोकशाहीच्या या महाउत्सवात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांना आवाहन केले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान व्यापक स्वरूपात करण्यासाठी विशेष सदिच्छादूतांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघात ख्यातनाम कवी गायक संदिप खरे यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार त्यांचे घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पर्वती विधानसभा मतदार संघात सुमारे ३ हजार ३६० दिव्यांग मतदार आहेत. ही संख्या विचारात घेता दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी निवडणूक प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे. या मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरीता पर्वती विधानसभा मतदारसंघात सदिच्छादूत म्हणून प्रसिद्ध अंध कलाकार प्रवीण रमेश पाखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे श्री. खैरनार यांनी सांगितले.
सदिच्छादूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले श्री. खरे हे ख्यातनाम कवी व गायक असून रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे. विशेषत: युवावर्ग श्री. खरे यांच्या कवितांचा चाहता आहे. श्री. पाखरे हे स्वतः अंध असून ते पुणे येथील भारतीय खाद्य महामंडळात कार्यरत आहेत. अंध कलाकारांसमवेत ते गेल्या अनेक वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. ते स्वतः निवेदक, वादक आणि गायकही आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी ते सदिच्छादूत म्हणून आवाहन करणार आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्ष योगदान देणाऱ्या श्री. खरे व श्री. पाखरे यांच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जाणार आहे.
0 टिप्पण्या