चित्रा न्युज ब्युरो
कोल्हापूर : राज्य परिवहन सहकारी बँकेच्या पंढरपूर शाखेत लिपिक पदावर काम करणार्या कर्मचार्याची विभागीय चौकशी सुरू होती. यात तक्रारदाराचे निलंबन रद्द करून सेवेत हजर करून घेण्यासाठी लाचेची मागणी करून त्यातील एक लाख दहा हजारांची रक्कम स्वीकारली. याप्रकरणी संशयित राहुल रमेश पुजारी (वय 43, रा. कोल्हापूर) या बँकेच्या चौकशी अधिकार्यास पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले.
बँकेच्या पंढरपूर शाखेत लिपिक पदावर कार्यरत असताना 185 दिवस लॉगीन केले नसताना मस्टरवर हजर असल्याचे दाखवून बँकेकडून सात महिन्यांचा पगार घेतला. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते सात महिने भरले नाहीत, असा आरोप तक्रारदाराविरोधात होता. याची बँकेमार्फत विभागीय चौकशी लावली होती. चौकशीकरिता बँकेच्या कोल्हापूर शाखेचे निरीक्षक राहूल पुजारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या चौकशीमध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व लवकर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पुजारी यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती 1 लाख 60 हजार देण्याचे ठरले. पडताळणीपुर्वी तक्रारदाराकडून पुजारी यांनी 50 हजार रुपये स्विकारले. दरम्यान 30 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रारदार यंचे निलंबन रद्द करून त्यांना सेवेत हजर करुन घेतले. बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात नेमणुक केली. त्यानंतर पुजारी यांनी उर्वरित 1 लाख 10 हजार रुपये आणून देण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधला. याबाबतची सत्यता पडताळणी करून संशयित पुजारी याने तक्रारदाराकडून चौकशी अहवाल आणि त्याच्या बाजूने पाठविलेचा मोबदला म्हणून 1 लाख 10 हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाच रक्कम एका राष्ट्रीयकृत बँकेच्या दारात स्विकारताना पुणे विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात भष्ट्राचार अधिनियम 1988 चे कलम 7/7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताच्या पाचगाव येथील घराचीही झडती रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
0 टिप्पण्या