Ticker

6/recent/ticker-posts

बार्शी शहरात गुटख्याचा बेकायदेशीर व्यवसाय फोफावला


नागरिकांची एस.पी. मा.अतुल कुलकर्णी साहेबांकडे कारवाईची मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :- जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुक्यात बंदी असतानाही विविध प्रकारच्या गुटख्याची विक्री खुलेआम सुरू असून, त्यामध्ये आर.सी. विमल, डायरेक्टर, राज निवास, नंबर १ यांसारख्या ब्रँडचा समावेश आहे. हे गुटखा उत्पादने मोठ्या प्रमाणावर शहरात वितरित केली जात असून, यामुळे स्थानिक वसुलदार नाममात्र कारवाईत गुंतले असून प्रत्यक्षात प्रभावी कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. या अवैध व्यापाराची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक (एस.पी.) साहेबांनी यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

शहरातील काही ठिकाणी रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा उतरवला जात असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. विशेषतः लता टॉकीजजवळ जाकीर चौधरी, रावळ गल्लीतील बिलाल तांबोळी, बालाजी कॉलनीतील योगेश गाताडे आणि बागड यांचा ट्रकने गुटखा आणला जातो, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. हा गुटखा गोडाऊनमध्ये ठेवला जातो आणि त्यानंतर शहरातील पान टपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर विक्री केंद्रांमार्फत तो खुलेआम वितरित केला जातो.

गुटख्याच्या सहज उपलब्धतेमुळे अनेक नागरिक व्यसनाच्या आहारी जात असून, यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः तरुण पिढी आणि अल्पवयीन मुले याला बळी पडत आहेत. तंबाखू व गुटख्याचे सेवन हे कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारांना कारणीभूत ठरत असल्याने, यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे हा अवैध व्यवसाय केवळ कायद्याच्या दृष्टीने नव्हे, तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत गंभीर बाब आहे.

गुटख्याच्या विक्रीस बंदी असतानाही किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली जाते, मात्र या व्यापारामागील मुख्य सूत्रधारांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यामध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) व पोलीस विभागातील काही अधिकारी दरमहा ठराविक रक्कम घेऊन या गुटखा तस्करीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच स्थानिक प्रशासनाकडून किरकोळ विक्रेत्यांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जात असली, तरी गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणारे मोठे व्यापारी अजूनही मोकाट सुटले आहेत.

एस.पी. साहेबांनी स्वतः लक्ष घालून कठोर कारवाई करावी

गुटखा तस्करी हा केवळ आर्थिक फायद्यासाठी चालणारा व्यवसाय नसून, हा आरोग्य आणि कायद्याचा मोठा प्रश्न बनत चालला आहे. त्यामुळे बार्शी शहर व तालुक्यातील गुटखा तस्करी करणाऱ्या प्रमुख व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. विशेषतः पोलिस अधीक्षक (एस.पी.) साहेबांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तपास सुरू करावा आणि या गुटखा माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या