Ticker

6/recent/ticker-posts

सुयश विद्यालयाचा अभिमान! राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी विश्वेश देशपांडेची निवड

टीव्ही9 समूहाच्या निवड चाचणीत महाराष्ट्रातील सहा खेळाडूंची निवड – बार्शीच्या सुयश विद्यालयाचा विद्यार्थी विश्वेश देशपांडे राष्ट्रीय स्तरावर

चित्रा न्युज प्रतिनिधी
 सोलापूर :- मुंबई येथे आयोजित टीव्ही9 समूहाच्या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल निवड चाचणीत महाराष्ट्रातून केवळ सहा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, या निवडलेल्या खेळाडूंमध्ये बार्शीच्या सुयश विद्यालयातील विद्यार्थी कुमार विश्वेश देशपांडे याचा समावेश झाला आहे. ही बाब बार्शीकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.

विश्वेश देशपांडेच्या उल्लेखनीय निवडीमुळे सुयश विद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले असून, संपूर्ण विद्यालय आणि बार्शी शहरासाठी हा मोठा सन्मान आहे. त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे, उत्कृष्ट खेळकौशल्याचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित आहे.

सुयश विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास नलवडे आणि मुख्याध्यापक सागर मंडलिक यांनी कुमार विश्वेश देशपांडेच्या या यशाचे कौतुक केले.

"विश्वेशने बार्शीचे नाव उज्ज्वल केले असून, त्याची जिद्द आणि मेहनत युवा खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल," असे शिवदास नलवडे यांनी सांगितले.

मुख्याध्यापक सागर मंडलिक यांनी सांगितले की, "सुयश विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर नेहमीच भर दिला आहे. विश्वेशच्या या यशामुळे आम्हाला अभिमान वाटतो. भविष्यात त्याला आणखी मोठ्या स्पर्धांसाठी संपूर्ण सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल."

मार्च 15 दरम्यान दिल्ली येथे चार महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर पंजाब सरकारच्या प्लॅटफॉर्मवर स्पर्धा होणार असून, त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धांनंतर ऑस्ट्रियामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते.

विश्वेशच्या यशामध्ये सुयश विद्यालयाचे व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. खेळाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शाळेच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक होत आहे. प्रशिक्षकांनी त्याला सातत्याने मार्गदर्शन करत त्याच्या खेळात सुधारणा घडवून आणली.

विश्वेश देशपांडेच्या निवडीबद्दल शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि बार्शी शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी त्याला पाठिंबा आणि प्रेरणा देण्याचे आश्वासन सर्वांनी दिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या