चित्रा न्युज प्रतिनिधी
गोंदिया :-गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला गावात 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मातोश्री सोनाबाई गोस्वामी महाविद्यालय तेढा प्राचार्य डॉ. जी.एम. बघेले यांनी भूषवले होते. उद्घाटन सौ. चित्रलेखाताई चौधरी, सभापति पंचायत समिती गोरेगाव, दीपप्रज्वलन रामेश्वरजी महारवाडे, उपसभापती पंचायत समिती गोरेगाव, आणि उपाध्यक्ष एड. कृष्णाजी पारधी यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमादरम्यान गावातील कर्तबगार जेष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. घनश्याम बघेले यांनी आपल्या भाषणात सर्वानी आपल्या पल्ल्यात सर्जनशीलता विकसित करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही प्रमाणात सर्जनशीलता असते, जी निसर्ग निर्मित किंवा ईश्वराने प्रदान केलेली असते. या सद्गुणांचा शोध घेतल्यास, पोषक वातावरण दिल्यास, पाल्यांना सर्जनशील बनविता येते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलविता येते.
डॉ. बघेले यांनी आग्रहपूर्वक सांगितले की मुलांनी स्वयंस्फूर्तीने कामे करावीत यासाठी त्यांना विशेष संधी देणे आवश्यक आहे. "तुला ते जमणार नाही" किंवा "तुझ्यात ती क्षमता नाही" असे म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व दाबून टाकण्यापेक्षा, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या क्षमता वाढवाव्यात. त्यांनी मुलांची इतरांशी तुलना करू नये असे मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. एम. टी. कटरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. डी.डी. बिसेन सर, मुख्याध्यापक यांनी केले. मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेच्या स्वयंसेवक कु. दीप्ती पारधी यांनीही मोलाची मदत केली.
0 टिप्पण्या