Ticker

6/recent/ticker-posts

ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर झाली बैठक:उद्धव ठाकरे युतीसाठी तयार, अनिल परबांवर जबाबदारी; चंद्रकांत खैरेंचा खुलासा


चित्रा न्युज प्रतिनिधी 

मुंबई-उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे म्हटले जात आहे. आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील उद्धव ठाकरे आणि मनसेसोबतच्या युतीवर मोठे भाष्य केले. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती, असा खुलासा खैरे यांनी केला आहे. लवकरच दोन्ही बंधू एकत्र येतील, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सूचक विधाने केली जात आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना लवकरच बातमी देतो म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच चंद्रकांत खैरे यांच्या खुलाशयामुळे राज उद्धव यांची जवळीक वाढल्याचा अंदाज आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चंद्रकांत खैरे यांनी मोठा खुलासा केला आहे. राज-उद्धव एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती. बैठकीत उद्धव ठाकरे युतीसाठी तयार आहेत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. आपण हात पुढे करायला तयार आहोत, ते टाळी देतात का पाहू. या युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परब यांच्यावर दिली होती. लवकरच दोन्ही बंधू एकत्र येतील, असा दावाही खैरे यांनी केला आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी हे दोघे बंधू एकत्र यावेत ही तमाम शिवसैनिकांची इच्छा असल्याची भावना व्यक्त केली आहे. राज व उद्धव यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आम्ही केवळ इच्छा व्यक्त करतो. प्रत्यक्ष त्यांनी एकत्र आले पाहिजे. या दोघांसह शिंदे यांनीही एकत्र येऊन एक अखंड शिवसेना तयार करावी, असे ते म्हणालेत. शिवसेनेच्या विभाजनामुळे शिवसेनेचे खूप मोठे नुकसान झाले. आज दोन्ही बंधू एकत्र येण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहेत. ते ही या युतीत आले पाहिजेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या