Ticker

6/recent/ticker-posts

प्रस्थापितांच्या गर्दीत धाडसी एन्ट्री : उमेश काकडे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : एकीकडे राजकारण गलिच्छ आहे. चांगल्या लोकांचं नाही. येथे निष्ठा, नैतिकता यापेक्षा पैसा, घराणेशाही, जात या बाबींना महत्व आहे. तर दुसरीकडे असेही म्हणतो की राजकारणात चांगल्या लोकांनी आलं पाहिजे. ही व्यवस्था बदलली पाहिजे, वगैरे...

या दोन्ही बाजू अगदी बरोबर आहे. राजकारण घाण झालं आहे. ही घाण स्वच्छ झाली पाहिजे असे सर्वांनाच वाटते पण ती घाण आपण नाही तर दुसऱ्या कुणी साफ करावी, ही भूमिका जनतेची असते. बरं एखादा चांगला चेहरा राजकारणात येऊ पाहतो तर त्याला उत्स्फूर्तपणे जनता स्वीकारत देखील नाही. त्यामुळेच *महान तर्कशास्त्री प्लेटो म्हणतो की, "जनता को उनकी योग्यता नुसार जनप्रतिनिधि मिलते है।"*

भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेना (दोन्ही गट) या प्रस्थापित राजकीय पक्षांनी भद्रावती शहरात नगराध्यक्ष पदाकरीता पालिकेच्या राजकारणातील जुनेच चेहरे दिले. नविन चेहरा देऊन निवडून आणण्याचे धाडस एकाही राजकीय पक्षात दिसून आले नाही. किंबहुना ती त्यांची क्षमता नसावी. यात मात्र बहुजन समाज पक्षाने धाडस केले. त्यांनी मतदारांपुढे फ्रेश, नविन, समाजातील सक्रिय चेहरा दिला, ज्यांचे नाव आहे *श्री. उमेश काकडे.*

सन १५ ऑगस्ट १९९७ ला भद्रावती नगरपालिकेची स्थापना झाली. आज या नगरपालिकेला २८ वर्षे होत आली. मात्र या शहरातील ९०% भौतिक विकास साधण्याकरिता या पालिका क्षेत्रातील राजकारणी अपयशी ठरले. तरीही त्याच त्या चेहऱ्यांना भद्रावतीकरांच्या मानगुटीवर बसविण्यासाठी उमेदवारी देण्याचे पाप या राजकीय पक्षांनी केले. एकदा संधी मिळूनही जर एखाद्या जनप्रतिनिधीने शहरात चिरस्थायी व दूरगामी असे एकही विकासकार्य केले नसेल. तर परत त्याच व्यक्तीला दहा संध्या देऊन तो काय वेगळे करणार आहे. जे आजपर्यंत झाले तेच होईल. *"आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल".*

बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेश काकडे हा शहरातील जुन्याच उमेदवारांच्या गर्दीतील नवा चेहरा आहे. उमेश कितपत या पदाला न्याय देईल हा नंतरचा विषय आहे. कारण सध्या निवडणुकीच्या रिंगणात या पदाला संपूर्ण न्याय देणारा दुसरा चेहरा आहे, असे छातीठोकपणे एकही समजदार नागरिक सांगू शकणार नाही. मात्र उमेश शहरात नविन काही करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. किमान शहराला नवी दिशा देण्याचे कार्य उमेश नक्कीच करेल. शहरातील बेशिस्त दूर करुन भौतिक विकास जरी साधता आला तरी तो यशस्वी असेल. आणि उमेश मधे ती करण्याची धमक आहे. एवढ्या दिग्गज राजकारण्यांच्या वर्तुळात नगराध्यक्ष पदाकरीता स्टँड होणे, यातच उमेशचा विजय झाला आहे. निवडणूक लढतो म्हणणे आणि लढणे यात खुप फरक आहे. दम लागतो निवडणूक लढायला. तो दम उमेशने दाखविला म्हणून तो इतरांपेक्षा सरस आहे. कुठलाही बॅकअप नसताना, आर्थिक सुबत्ता नसताना, त्याने आपली उमेदवारी ठेवली, हे त्याच यश आहे. आणि हे कुणीही भद्रावतीकर नाकारू शकत नाही. उमेशच्या हिंमतीची दाद दिलीच पाहिजे. बाहेरून कमेंट्स करणे सोपे असते, मैदानात उतरणे कठीण असते. आणि कठीण काम करणे सर्वांच्या आवाक्यात नसते.

उमेशच्या पाठीमागे असलेल्या व्यक्तीकडे अजून पर्यंत भद्रावतीकरांचे लक्ष गेले नाही आहे. भद्रावती शहरातील मोजक्या बुद्धिजीवी व्यक्तींपैकी एक, शहरात वेगळा विचार करणारा व्यक्ती, अभ्यासु, निर्भीड, व्हिजनरी म्हणून ओळखल्या जाणारे शहराला गर्व व्हावा असे व्यक्तिमत्व आहे, *सन्मा. एड. भूपेंद्र रायपूरे सर...*

सन्मा. एड. भूपेंद्र रायपूरे सर उमेशच्या सोबत असणे, ही उमेशची दुसरी जमेची बाजू आहे. रायपूरे सर यांना सूक्ष्म नजरेतून बघणारे व ज्यांना विद्वत्ता काय असते कळते, त्यांना रायपूरे सरांची क्षमता चांगलीच माहिती आहे. सध्याच्या राजकीय मोजपट्टीत जर रायपूरे सर यांना कुणी मोजत असेल तर तो त्यांचा दोष आहे. रायपूरे सर सारखे व्यक्ती समाजाने स्वीकारायचे असतात. त्यांना नेतृत्व द्यायचे असते. दुर्दैवाने समाजाकडून ते होत नाही. त्यांना विशिष्ट जातीत गणून दूर ठेवल्या जाते. ही त्यांची नाही तर समाजाची हार असते.

उमेश काकडे यांना विजयी करणे म्हणजे एड. भूपेंद्र रायपूरे सर यांना विजयी करण्यासारखे आहे. शहरात खरच काही चांगले व्हावे, असे वाटत असेल तर जनतेनी ही बाजू समजून घेणे आवश्यक आहे.

तसेही मतदारांनी प्रयोगशील असणे आवश्यक आहे. ही व्यवस्था एका दिवशी बदलणार नाही, अनेक निवडणूका लागेल पुन्हा, कारण मतदार हा जात, धर्म, पक्ष, पैसा यात विखुरला आहे. त्यामुळे प्रयोग स्वीकारले पाहिजे. बदल होत राहिले पाहिजे. कदाचित हे विचार सर्वांनाच पटणार नाही. आणि पटत नाही म्हणूनच समाजाची ही दशा आहे.

कुणीही आले तरी तेच करणार आहे, सर्व घर भरासाठीच उभे आहेत, असे जेव्हा मतदार बोलतात, तेव्हा त्यांचे हे बोलणे अपूर्ण सत्य असते. कारण या गलिच्छ राजकारणामुळे जनता व मतदार एव्हढा फ्रस्ट्रेशन मधे गेला आहे की काही चांगलं होईल किंवा कुणी येवून काही चांगल करेल, यावर विश्वासच उडाला आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे साहजिक आहे. मात्र प्रयोग तर करत राहावे लागतील न. बदल घडवत रहावे लागेल न. जोपर्यंत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत सत्य कसे सापडेल.

शेजारच्या वरोरा नगरपालिकेतील निकाल बघा, प्रत्येक टर्म ला नगराध्यक्ष बदलत राहिला आहे. तेच ते उमेदवार निवडून देत नाहीत. प्रत्येक वेळी नविन चेहरा नगराध्यक्ष असतो. त्यामुळे सत्तेत स्पर्धा राहते. हे भद्रावती नगरपालिकेत दिसत नाही. म्हणून शहरात विकास होत नाही.

एखाद्या आस्थापनेच्या प्रमुख पदावर सक्षम व्यक्ती न बसणे, हे त्या सक्षम व्यक्तीचे नुकसान नसते तर त्या आस्थापनेच्या प्रगतीचे नुकसान असते.

उमेश काकडे यांना भद्रावतीचा नगराध्यक्ष बनविणे हा एक प्रयोग आहे. प्रस्थापितांना अद्दल घडविणारा हा प्रश्न प्रयोग आहे. जनतेतून निवडून गेल्यावर काम करावी लागणार, हे सांगणारा हा प्रयोग आहे. मतदारांना गृहीत धरु नका, हे सांगणारा प्रयोग आहे. तो प्रयोग भद्रावतीकर करतील, ही अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या