चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : स्थानिक विवेकानंद विद्यालयात दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक - पालक संघ व माता पालक संघाची सभा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी मंचावर पालक श्री गणपत शेरकुरे, माता पालक सौ. प्रिया खांडरे आणि सदस्य सचिव श्री दयाकर मग्गीडवार उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद आणि माँ सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन व मान्यवरांचे स्वागत करून सभेला सुरुवात करण्यात आली.
सदस्य सचिव श्री दयाकर मग्गीडवार सर यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून सभेला सुरुवात केली. तद्नंतर एकेका विषयावर उपस्थित पालकांसोबत चर्चा घडवून आणण्यात आली.
कनिष्ठ लिपिक श्री विनोद गावंडे यांनी विविध शिष्यवृत्ती योजना, त्याकरिता आवश्यक कागदपत्रे, कागदपत्रे ऑनलाइन करताना येणाऱ्या अडचणी व त्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाय इत्यादी बाबींवर सविस्तर माहिती दिली.
सभेत प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिस्तीबाबतची अनास्था, शाळेत वेळेवर न येणे, वारंवार गैरहजर राहणे, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा, विविध सहशालेय उपक्रम आदि विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात येऊन संबंधित ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
सभेला पालकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेच्या कामकाजात व चर्चेत मोठ्या उत्साहात भाग घेतला. विविध शंका, सूचना त्यांच्यातर्फे मांडण्यात आल्या.
यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बांदूरकर मॅडम यांनी पालकांशी संवाद साधत त्यांच्या शंका, सूचना यांवर आपले मत व्यक्त करत गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला.
शाळेत राबवले जाणारे उपक्रम, स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या विशेष तासिकांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला नियमित शाळेत पाठवावे व मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवावे,
असे आवाहनही त्यांनी केले.
घरी पालकांनी मुलांशी शाळेतील उपक्रमांबाबत संवाद साधावा,
असेही मुख्याध्यापिकांनी नमूद केले.
सभेचा समारोप उपस्थित पालकांचे आभार मानत व त्यांच्या शंकांचे निरसन करून करण्यात आला.
सूत्र संचालन तुकाराम पोफळे सर आणि आभार प्रदर्शन सौ आशा गावंडे मॅडम यांनी केले.


0 टिप्पण्या