बहारदार गीतांच्या मेजवानीने प्रेक्षक मंत्रमुग्ध
सयाजीराजे वाद्यवृंदास रु.५००१ चे बक्षीस
चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज — सदाशिवराव माने विद्यालयात दि. २० व २१ नोव्हेंबर कालावधीत आयोजित केलेल्या ‘कृष्णप्रियोत्सव- २०२५’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप जल्लोषपूर्ण गीतांनी झाला.
दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये प्रथम दिवशी विद्यार्थ्यांनी स्व-कल्पनेतून साकारलेल्या चित्रकला, कृषी, विज्ञान, रांगोळी, पुष्परचना व भित्तीपत्रक या दालनांचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले. यामध्ये विद्यालयातील माध्यमिक, उच्चमाध्यमिक, व्यवसाय, द्विलक्षी या विभागातील एकूण ५३२ विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे उत्तम सादरीकरण केले. यानंतर स.म.शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन च्या भव्य रंगमंचावर इयत्ता ५ वी ते ८ वी च्या १५ सांस्कृतिक गीतांचे सादरीकरण झाले.
दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळ सत्रात विदयालयाच्या सयाजीराजे वाद्यवृंदाच्या २५ बालकलाकारांनी दर्जेदार ८ गीते सादर केली. या सर्व गीतांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कलाकारांना ५००१/- रुपयांचे बक्षीस दिले. या गीतांतील कलाकारांचा व मार्गदर्शक शिक्षक सुहास पवार, बाळासाहेब झांबरे व स्नेहा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापकांच्या विनंतीवरून स्पर्धेचे परीक्षक ज्ञानेश्वर शेलार यांनी अतिशय सुरेल आवाजात ‘या सुरांनो चंद्र व्हा….’ हे गीत सादर केले.
यानंतर इयत्ता ९ वी व ११ वी च्या सांस्कृतिक गीतांचे सादरीकरण झाले. यामध्ये शिवगर्जना, गोंधळी, साऊथ इंडियन, धनगरी, वारकरी, कोळी, राजस्थानी, गुजराती, प्रासंगिक व चित्रपट अशा विविध गीत प्रकारातून १८ गीते सादर झाली.
दोन्ही गटांनी अत्यंत नेत्रदिपक गीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांच्या टाळयांनी व जल्लोषपूर्ण उत्साहाने रंगमंच आनंदाने बहरून गेला. दर्जेदार गीतांच्या सादरीकरणामुळे दोन्ही गटात चुरस पाहवयास मिळाली.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी कलाकारांनी सादर केलेल्या कलेचे कौतुक करून विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर दोन दिवस चाललेल्या सांस्कृतिक गीतांचा गटवार निकाल पुढील प्रमाणे-
स्पर्धेचा गटवार निकाल-
🎵गट क्रमांक १-(इयत्ता ५ वी-६ वी)
प्रथम- ६ वी इ,फ- कोळी गीत, द्वितीय- ६ वी क,ड- वाघ्यामुरळी गीत, तृतीय- ६ वी अ, ब -महाराष्ट्र गीत
🎵गट क्रमांक २ (इयत्ता ७वी ते ८ वी)- प्रथम- (विभागून)- ७ वी क,ड- चित्रपट गीत, ८ वी अ,ब - आदिवासी गीत, द्वितीय- ८वी इ,फ - कॅसेट गीत, तृतीय- ८वी ग,ह,ज- धनगरी गीत
गट क्रमांक ३ (इयत्ता ९ वी)- प्रथम- ९ वी ब- चित्रपट गीत, द्वितीय- ९ वी ह- वारकरी गीत, तृतीय- ९ वी ज- कोळी गीत
🎵गट क्रमांक ४ (इयत्ता ११ वी)-
प्रथम (विभागून)-११ वी क : शंभूवंदना, ११ वी फ: शास्त्रीय संगीत, द्वितीय-११ वी ई: बॉलीवूड गीत, तृतीय- ११ वी ब: शिवगर्जना, उत्तेजनार्थ- ११ वी ग दांडिया गरबा गीत
या विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह झळकत होता.
या उत्सवाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजी सावंत अध्यक्ष म्हणून लाभले याप्रसंगी शि. प्र. मंडळाचे संचालक नारायण फुले, उत्कर्ष शेटे, पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, प्रशाला समिती सदस्य ॲड. रणजितसिंह माने-देशमुख, माता-पालक संघ उपाध्यक्षा गायत्री शेटे व सदस्यांची उपस्थिती लाभली.
कला, विज्ञान, कृषी या दालनांचे परीक्षण एस.एम. शिंदे, एस.एस. भोसले, रमाकांत साठे, दीपक साळुंखे, तर सांस्कृतिक गीतांचे परीक्षण संगीत विशारद ज्ञानेश्वर शेलार यांनी केले.
या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अनुराधा निंबाळकर, प्रतिभा राजगुरू, कृष्णा सरवदे व शैलेश माने-पाटील यांनी केले. निकालाचे वाचन उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांनी केले. सांस्कृतिक प्रमुख दिग्विजय जाधव व विविध गुणदर्शन प्रमुख मंगेश शिंगाडे यांनी सर्व समित्यांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.


0 टिप्पण्या