चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या इयत्ता 5 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती ही तालुका बदलून करावी अशी मागणी स्थानिक पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पालकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील गरीब व मेहनती विद्यार्थ्यांना नवोदय सारख्या दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी पालक मोठ्या अपेक्षेने प्रयत्न करतात. मात्र, परीक्षेदरम्यान काही ठिकाणी कॉपीचा प्रकार घडत असल्याची तक्रार पालकांनी केली. त्यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
त्यांनी असेही म्हटले आहे की,
परीक्षेवर पूर्ण नियंत्रण असावे, परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी संबंधित परीक्षेच्या दिवशी नेमलेले पर्यवेक्षक हे संबंधित त्याच तालुक्यातील नसावेत. अशा प्रकारे पर्यवेक्षकांची तालुका बदली करूनच परीक्षा पार पाडावी, अशी ठाम मागणी पालकांनी निवेदनातून केली आहे.
पालकांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना प्रतिलिपी देऊन योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.


0 टिप्पण्या