व्हीबी.जी. रामजी’ सॉफ्ट प्रणालीतून इतर मजुरांची मागणी बंद
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी (श.प्र.):-प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलांच्या बांधकामावर आता केवळ लाभार्थी कुटुंबातील सदस्यांनाच मजूर म्हणून काम करता येणार आहे. ‘व्हीबी.जी. रामजी’ या नव्या सॉफ्ट प्रणालीमुळे बाहेरील मजुरांची मजूर मागणी (डिमांड) घेणे बंद झाल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामविकास विभागाने घरकुल बांधकामात पारदर्शकता आणण्यासाठी ‘व्हीबी जी रामजी’ योजनांमध्ये हे ऑनलाईन सॉफ्टवेअर सुरू केले आहे. या प्रणालीत लाभार्थ्याचे आधार, जॉब कार्ड व बँक खाते लिंक केले जाते. घरकुलाचे हप्ते थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात व मजुरीचा हिशोबही त्याच प्रणालीतून करण्यात आल्याने मजुरांनी कामासाठी मागणी केली असता ग्रामपंचायत प्रशासन गरीब कुटूंबातील मजुरांना काम पुरविण्यास असक्षम झाली आहे.त्यामुळे इतर मजुरांची कामाची मागणी आली असल्यास वयक्तिक लाभाच्या कामापासून मुकावे लागणार असल्याने “मागेल ते काम’हे घोष वाक्य राहणार आहे.त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासनाला मजूर मागणीच्या आधारे सार्वजनिक स्वरूपाचे काम शोधून मजूरप्रधान कामाचे मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी वाढली आहे. व्हीबी जी रामजी योजनांमध्ये नवीनसॉफ्ट प्रणाली आल्याने घरकुलाच्या मजुरीचे 90 ते 95 दिवस लाभार्थी कुटुंबातील सदस्यांनीच करावयाचे आहेत. त्यांची हजेरी एनएमएमएस ॲपवर जिओ-टॅग फोटोसह ऑनलाईन नोंदवली जाते. त्यामुळे बाहेरील गवंडी, मजूर यांची स्वतंत्र मजूर मागणी प्रणाली स्वीकारत नाही. फक्त कुशल कामासाठी गवंडी लावल्यास त्याचे पेमेंट लाभार्थ्याने स्वतः करायचे असून शासनाकडून त्याची मजुरी मिळणार नाही.गवंडी लावल्यास त्याचा खर्च लाभार्थ्याने साहित्याच्या रकमेतून करायचा आहे.
लाभार्थ्यां समोरील अडचणी
"शासनाचा उद्देश लाभार्थ्याला स्वतःच्या घराच्या कामात सहभागी करून घेणे व रोजगार हमीतून मजुरी देणे हा असलातरी घरात कर्ता पुरुष नसलेल्या, वृद्ध किंवा एकट्या महिला लाभार्थ्यांना स्वतः मजुरी करणे शक्य नाही.तसेच घरकुल लाभार्थी एकटाच जाबकार्डधारक असेलतर त्याला 90 दिवस काम करावे लागणार आहे.स्लॅब, प्लास्टर, फरशी यासारखी कामे कुटुंबातील अकुशल सदस्यांना जमत नसल्याने इतर मजूर लावले तरी त्यांची हजेरी लागत नसल्याने मजुरीचे 27 हजार रुपये मिळत नाहीत. त्यामुळे घरकुले अर्धवट राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाभार्थ्यांची मागणी
वृद्ध, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांना या नियमातून वगळावे व किमान 50% बाहेरील मजूर लावण्याची मुभा द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. तसेच गवंड्याची मजुरीही शासनाने द्यावी, अन्यथा घरकुले पूर्ण होणे कठीण असल्याचे मत व्यक्त होत आहे.व्हीबी जी रामजी योजनांमधील नवीन सॉफ्ट प्रणाली आल्याने पारदर्शकता येईल हा उद्देश चांगला असला तरी स्थानिक परिस्थितीचा विचार करून नियमात शिथिलता द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.


0 टिप्पण्या