चित्रा न्युज प्रतिनिधी
परभणी:- : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात दि. 19 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात नागरिकांना विविध शासकीय सेवा, तसेच तक्रारींचे निवारण करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय विविध सेवा विषयक पोर्टलवरवरील प्रलंबित तक्रारींचे या काळात प्राधान्याने निराकरण केले जाणार आहे. विभागप्रमुखांनी सुशासन सप्ताह प्रभावीपणे राबवून प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयत आज सुशासन सप्ताहबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
सुशासन सप्ताह दरम्यान नागरिकांना शासकीय सेवा पुरविणे, आपले सरकार, पीजी पोर्टल, कार्यालयास प्राप्त तक्रारी आणि सेवा हक्क हमी कायदा अंतर्गत प्राप्त तक्रारींचे निरसन करणे, विशेष शिबिरांचे आयोजन करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासन अधिक गतीमान करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे.
सुशासन सप्ताहात राबविण्यात येणारे उपक्रम विभागप्रमुखांनी जबाबदारी आणि दक्षतेने यशस्वी करावेत. त्यासाठी काटेकोर नियोजन करुन दिलेल्या सुचनेनुसार काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.


0 टिप्पण्या