मतदानानंतर मतमोजणी प्रक्रियाही शांततेत पार
चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर:जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींमधील निवडणुका दि. २ डिसेंबर रोजी ३१८ मतदान केंद्रांवर उत्साहपूर्ण पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी प्रक्रियाही त्या त्या ठिकाणी शांततेत पार पडली. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था चोख राखत आवश्यक सुविधा, योग्य पोलीस बंदोबस्त आणि मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. यामुळे जिल्ह्यात एकूण ७८.८७ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये मुरगूड – ८८.४३%, मलकापूर – ८६.९९%, आणि वडगाव – ८६.२४% या नगरपरिषदा राज्यात मतदान टक्केवारीत पहिल्या तीन क्रमांकांवर होत्या. मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता तसेच सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले होते. मतमोजणी प्रक्रियेनंतर सर्व प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल सहभागी सर्व यंत्रणांचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विशेष अभिनंदन केले.


0 टिप्पण्या