Ticker

6/recent/ticker-posts

साकोली नगर परिषदेत सीसीटीव्ही सोडून एलसीडी खर्चावर प्रश्नचिन्ह


रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : नगरपरिषदेच्या काही निर्णयाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व तेवढाच संताप व्यक्त होत आहे. शहरातील गुन्हे नियंत्रणात आणणारे सीसीटीव्ही कॅमेरे न लावता चौकात चौकात जाहिराती करिता मोठमोठे एलसीडी टीव्ही लावण्यात आले. त्यावर लाखो रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे आता राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकाचे लक्ष विचलित होत आहे. गेल्या महिन्यात साकोली सेंदुरवाफा भागात नगरपरिषदेने जाहिरातींच्या उद्देशाने चौका चौकात एलसीडी टीव्ही बसविले. एकीकडे साकोली सेंदूरवाफा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज भासत असतांना दुसरीकडे प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करून अनावश्यक खर्च केला जात आहे. शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असल्याने वारंवार रस्ते अपघात घडत असतात. शिवाय गेल्या काही वर्षांत चोरी आणि अनेक घटनांची नोंद झाली आहे. असे असूनही आजतागत या भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. ही मागणी आताची नाही. गत नगर नगरपरिषदेलासुद्धा नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केलेली होती. या संदर्भाचे वृत्त साकोलीच्या विविध प्रसिद्धी माध्यमातून उमटलेले होते. या बातम्यांची दखल घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तरतूद नवीन नगर परिषदेने करायला हवी होती परंतु झाले उलट. या बातम्यांची दखल घेण्यापेक्षा बातमीलाच बेदखल करण्याची हिम्मत नगर परिषदेने दाखवून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

कधी कधी गुन्हेगारांना पकडतांना पोलीस विभागाला अडचणींचा सामना करावा लागतो. जर चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लागले गेले तर पोलिसांना गुन्हेगार पकडण्यासाठी सहकार्य तर होईलच परंतु साकोली सेंदुरवाफाच्या नागरिकांना सुद्धा सुरक्षेसाठी मदत होईल. ज्या भागात सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, तिथे जाहिरातींच्या उद्देशाने एलसीडी टीव्ही बसवण्यासाठी सार्वजनिक निधीचा वापर करणे कितपत योग्य आहे.? त्याऐवजी जर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असते तर त्यामुळे गुन्हेगारीला आळा तरी घालण्यास मदत झाली असती आणि अपघातांवर प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य झाले असते. या संदर्भात साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या नगरसेवकांकडूनच प्रतिक्रिया मागविण्यात आल्यात त्या अशा.
_______________________________________________
          
साकोली सेंदुरवाफा संवेदनशील भागातील सुरक्षा व्यवस्था बळकट करणे हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. एलसीडी टीव्ही बसवण्याऐवजी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असते तर त्याचा थेट फायदा जनतेला झाला असता. हा मुद्दा नगर परिषदेच्या बैठकीत उपस्थित केला जाईल
इंजि. सपन कापगते. अपक्ष नगरसेवक, 
प्रभाग क्र. १०
_______________________________________________

सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. जर या भागात अपघात आणि चोऱ्यांचे सत्र सातत्याने सुरू असेल, तर नगर परिषदेने यावर तोडगा काढण्यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे ही निःसंशयपणे काळाची गरज आहे.
विवेक बैरागी. अपक्ष नगरसेवक,
प्रभाग क्र. ०९  
______________________________________________

नगरपरिषदेने आपल्या विकासकामांच्या उपक्रमांना प्रभावीपणे प्राधान्य दिले पाहिजे. साकोली-सेंदुरवाफा भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास गुन्हे नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होईल. या संदर्भात प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, स्थानिक रहिवाशांनी अशी मागणी केली की, नगर परिषदेने साकोली-सेंदुरवाफा भागात लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून या भागातील सुरक्षा व्यवस्था बळकट होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल"
कुणाल राऊत नगरसेवक 
प्रभाग क्र. ०३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या