मित्रनगर चौकातील खळबळजनक हत्या 6 तासांत उघड!
राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर: 25 जूनच्या मध्यरात्री रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मित्रनगर चौकात घडलेल्या खळबळजनक हत्येचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. आई आणि मृत व्यक्तीमध्ये कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या 19 वर्षीय मुलाने दगडाने वार करून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
25 जून रोजी रात्री सुमारे 11.15 वाजता मित्रनगर चौकात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली. मृताच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख संतोष अरुण भेंडे (वय 48, रा. पाडा, जि. अमरावती) अशी पटली. ते मित्रनगर परिसरातील नातेवाईकांकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते.
घटनेनंतर रामनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अजय उर्फ एप्पल शंकर पोहनकर (वय 19) याला वडगाव परिसरातून ताब्यात घेतले. कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला त्याच्या आई आणि मृतक यांच्यात कथित प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या रागातून आणि वैमनस्यातून त्याने संतोष भेंडे यांच्यावर दगडाने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.
रामनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातखडे, एसडीपीओ प्रमोद चौगुले आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांच्या पथकांनी केली.
_______________________________________
🔪 _मित्रनगर हत्याकांड 6 तासांत उघड!
आईचे कथित प्रेमसंबंधाच्या संशयातून 19 वर्षीय मुलाने दगडाने ठेचून केली हत्या. मृतक अमरावतीहून नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आला होता. सीसीटीव्ही व गुप्त माहितीवरून आरोपी 'एप्पल' उर्फ अजय पोहनकरला वडगावमधून अटक. एसपी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिसांची धडक कारवाई.


0 टिप्पण्या