Ticker

6/recent/ticker-posts

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या न्याय्य मागणीला यश


चंद्रपूर जिल्ह्यातील कामवाटप प्रक्रिया स्थगित; पारदर्शकतेच्या लढ्याला यश

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या कामवाटपासाठी दिनांक 16 जून 2026 रोजी राजुरा येथे व दिनांक 18 जून 2026 रोजी चंद्रपूर येथे स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेबाबत राज्य अभियंता संघटना, चंद्रपूर व भाजपा अभियंता आघाडी, चंद्रपूर यांनी शासन निर्णय दिनांक 05 एप्रिल 2023 मधील तरतुदींचा संदर्भ देत आक्षेप नोंदविला होता.

संघटनेचे मत असे होते की, कामवाटप समिती ही जिल्हास्तरीय समिती असून संपूर्ण जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी एकत्रित, पारदर्शक व समान संधी देणारी प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र सभा घेणे हे शासनाच्या मूळ उद्देशाशी सुसंगत नसल्याची बाब वरिष्ठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.

या संदर्भात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री सचिवालय, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले होते.

त्यानंतर जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी दिनांक 15 जून 2026 रोजी नवीन नोटीस जारी करून दिनांक 16 जून व 18 जून 2026 रोजी प्रस्तावित कामवाटप सभा प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

ही बाब चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या न्याय्य मागणीचा व पारदर्शकतेच्या भूमिकेचा विजय असल्याची भावना अभियंत्यांमध्ये व्यक्त होत आहे.

राज्य अभियंता संघटना, चंद्रपूर यांच्यावतीने प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत असून आगामी काळात शासन निर्णयानुसार संपूर्ण जिल्ह्यासाठी एकाच ठिकाणी, एकाच प्रक्रियेद्वारे व पूर्ण पारदर्शकतेने कामवाटप प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

संघटना पुढील कामवाटप प्रक्रियेवर लक्ष ठेवून असून सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय्य व समान संधी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष इंजी. जगदीश लावडिया यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या