Ticker

6/recent/ticker-posts

मी आहे वनराज, माझ्या राज्यात माझाच दरारा !

   खरंच तालुक्यात वनराजाचे भय संपले काय ?

रवि भोंगाने  चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- गेल्या ३ महिन्याहून अधिक काळ साकोली तालुक्यातील बांपेवाडा, उमरझरी आणि आमगाव ( खुर्द )  परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि नागरिकांच्या मनात धडकी भरविणाऱ्या जखमी नरभक्षक वाघिणीला अखेर रविवारी सकाळी उमरझरी जंगल परिसरातून वनविभागाने जेरबंद केले. या वाघिणीला पकडल्याने अनेक दिवसापासून भीती व दहशतीच्या छायेखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. असे असले तरी खरंच तालुक्यात वनराजांचे भय संपले काय ? असा प्रश्न या निमित्ताने समोर आलेला आहे. नरभक्षी टी-२७ वाघीण जरी जेरबंद झाली असली तरी इतर परिसरातील बिबट्यांचे काय ? वीरसी परिसरात वय ५ वर्ष असलेली सुहेला ही मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडली त्यामुळे साकोली तालुक्यात वनराजाचे किंवा बिबट्याचे भय संपले काय ? असे हमखासपणे कुणी सांगायला तयार नाही. त्यामुळे," मी आहे वनराज, माझ्या राज्यात माझाच दरारा " असे म्हणावयास सध्या तरी हरकत नाही. टी-२७ वाघीण पकडली गेली असली तरी वन अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधी यांनी पुढच्या घटनेची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. वन विभागाच्या मैदानावर षटक पूर्ण होण्यास एक चेंडू बाकी आहे आणि हे षटक पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. कारण शेत शिवाराची कामे सुरू झालेली आहेत. जंगलाला लागून शेत शिवार असल्याने या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ' भय इथले संपत नाही ' असे बोलण्यासाठी जागा आहे. २०२६ या वर्षी साकोली तालुक्यात म्हणजेच नागझिरा व्याघ्र प्रकल्प लागून असलेल्या पिटेझरी परिसरात आतापर्यंत ५ घटना घडलेल्या आहेत. यातील १ बिबट्याची घटना वगळता संबंधित घटना ह्या वाघ आणि वाघिणीच्या संदर्भातच आहे. पहिली घटना आहे ती १९ मार्च २०२६. यात बांपेवाडा येथील वसंत मेश्राम (  वय ५३ ) हा इसम मोहफुल वेचण्यासाठी गेला असता वाघाने बळी घेतला. दुसरी घटना आहे २८ मार्च २०२६. उमरझरी येथील माया सोनवाने ही महिला मिरची तोडण्यासाठी शेतात गेली असता वाघाची बळी ठरली. तिसरी घटना आहे १ एप्रिल २०२६. आमगाव ( खू. ) येथील छाया  मुंगमोडे ही महिला वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. चौथी घटना आहे १५ एप्रिल २०२६. वीर्सी येथील विटा भट्टीवर काम करणाऱ्या मिरी या परिवारातील एक ५ वर्षीय आशीका नावाची बालिका बिबट्याची भक्ष्य ठरली. आणि ५ वी घटना आहे २४ जून २०२६. आमगाव  ( बु. ) येथील हरिचंद्र मडावी ( वय ४५ ) वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला. विशेष म्हणजे नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारा नजीक लागून असलेल्या पिटेझरी गावात वाघाने प्रवेश करून शौचास गेलेल्या इसमावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु त्याचे सुदैव असे की प्रसंगवधान राखून त्यांनी हातातील काठीचा धाक दाखवून पळ काढलेला होता.
-----------------------------------------------

मी या परिसरातील मूळ रहिवासी असून या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी म्हणून काम पाहिलेले आहे. या परिसरातील नागरिक शेत-शिवरातील उत्पन्नावर आपली उपजीविका करीत असतात. या नागरिकांचे शेत-शिवार नागझिरा अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. परिणामी कोणतेही वन्यप्राणी गावात आणि शेत-शिवारात प्रवेश करून नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. शेत-शिवाराची कामे सुरू झालेली आहेत. त्यामुळे एका बाजूला उदरनिर्वाहाचे साधन आणि दुसऱ्या बाजूला वन्य प्राण्यांची दहशत या कात्रीत या परिसरातील जनता अडकलेली आहे.

डॉ. नेपाल रंगारी,
माजी जिल्हा परिषद सदस्य.
----------------------------------------------

मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला आहे. तो थांबण्याचे अद्याप नाव घेत नाही. केवळ साकोली तालुकाच नव्हे तर सर्व दूर विदर्भात देखील शेत शिवार जंगलाला लागून आहे.  वन्य प्राण्यांना मानवी जीवाच्या रक्ताची चटक लागलेली आहे. त्यामुळे ते आपले भक्ष्य शोधण्यासाठी गावात आणि शेत शिवारात येणारच. वन विभागाची प्रक्रिया घटना घडल्यानंतरची असते. कोणत्या गावात आणि कोणाच्या शेत शिवारात वन्यप्राणी जाईल याची कोणतेही वन्यप्राणी वनविभागाच्या कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या व्हाट्सअप वर माहिती पाठवत नाही, किंवा येण्याची पूर्व सूचनासुद्धा कॉल करून सांगत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतः सावध राहून स्वतःची सुरक्षितता करावी लागेल. शेत-शिवारात एकटे न जाता घोळक्याने गेल्यास आणि हातात लाठीकाठी सोबत घेऊन असल्यास किमान थोडाफार बचाव करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःची सुरक्षितता स्वतःच करणे आवश्यक आहे. 

उमेश भुरे. सामाजिक कार्यकर्ता,
लाखांदूर रोड साकोली.
----------------------------------------------

बहुतांश आदिवासी समाजाची शेती जंगलव्याप्त आहे. आदिवासी कुटुंबाचे पोट बहुतांशी वन्य साहित्य शेतीवर अवलंबून आहे. त्यांना जंगलात गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. शासनाने आदिवासी समाजाला ज्या सोयी-सुविधा दिल्यात त्या तोडक्या ठरत आहेत. आदिवासी नागरिकांनी सरपन ( इंधन, जळाऊ लाकडे ) करिता जंगलात जाऊ नये म्हणून उज्वल गॅस योजना आणली. मात्र त्याची शासनाने वाट लावली. त्यामुळे आदिवासी नागरिकांना आणि इतरही नागरिकांना शासनाने कमाल उंचीवर सुरक्षितता प्रदान करावी.

स्मिता श्रीधर सिडाम, नगरसेवक 
साकोली नगरपरिषद, क्र.१०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या