गटनेते इंजि. संदीप बावनकुळे यांच्या पुढाकाराला यश; २८ तारखेच्या पोलिओ मोहिमेचाही घेतला आढावा
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १ ( प्रभाग क्र. ५ ) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक २ च्या इमारतींची दुरूस्ती व रखडलेल्या नागरी सुविधांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जन आरोग्य समितीचे अध्यक्ष, नगरसेवक तथा गटनेते इंजि. संदीप बावनकुळे यांच्या विशेष पुढाकारातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून या दोन्ही केंद्रांच्या इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य केंद्रांच्या इमारतींकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. यामुळे इमारतींची दुरवस्था झाली असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. स्थानिक नागरिकांची ही हक्काची आरोग्य केंद्रे पुन्हा सुसज्ज व्हावीत यासाठी इंजि. संदीप बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न केले. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ च्या इमारतीसाठी १० लाख रुपये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. २ च्या इमारतीसाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
इमारतींची प्रत्यक्ष पाहणी व तातडीने कामाचे निर्देश -
निधी मंजूर होताच जन आरोग्य समितीचे अध्यक्ष इंजि. संदीप बावनकुळे यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दोन्ही आरोग्य केंद्रांच्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. इमारतींची दुरवस्था झालेल्या भागांची बारकाईने पाहणी करून, दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले, जेणेकरून नागरिकांना लवकरच उत्तम आरोग्य सेवा मिळणे सुरू होईल. २८ तारखेच्या पोलिओ लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन या पाहणी दौऱ्यादरम्यान आगामी २८ तारीखला होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रभागातील व शहरातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे आणि व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, अशा सूचना इंजि. संदीप बावनकुळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी पाहणी दौऱ्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रमुख अधिकारी म्हणून डॉ. अतुल दोनोडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक रामटेके, आरोग्य सेवक अतुल बुरडे, आरोग्य सेवक अल्केश ढोरे, विवेक नंदेश्वर, आणि आरोग्य सेवक शुभम भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
या निधीमुळे दोन्ही आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलणार असल्याने साकोलीतील नागरिकांमधून आणि रुग्णांमधून इंजि. संदीप बावनकुळे यांच्या या जनहितैषी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.


0 टिप्पण्या