तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी अभिजित जगताप यांची माहिती
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली विशेष गहन पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड आणि माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, किनवट यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर तालुक्यात सदर अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली.
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरभेटी देऊन प्रत्येक मतदाराची माहिती पडताळण्यात येणार आहे. मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुहेरी नोंद असलेले अथवा अपात्र मतदार यांची नोंद वगळून पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
विशेष गहन पुनरीक्षण कार्यक्रम 2026 पुढील प्रमाणे आहे.
30 जून 2026 ते 29 जुलै 2026 घरभेटीद्वारे मतदार पडताळणी, माहिती संकलन व मतदार पडताळणी फॉर्म भरण्याची कार्यवाही., 05 ऑगस्ट 2026 प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध., 05 ऑगस्ट 2026 ते 04 सप्टेंबर 2026 दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी, 3 ऑक्टोबर 2026 : दावे व हरकतींचे निवारण पूर्ण. 07 ऑक्टोबर 2026 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध.
मतदारांनी घरभेटीदरम्यान बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे. पडताळणी फॉर्म काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. तसेच ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नाही, अथवा नाव, पत्ता, वय किंवा इतर तपशीलामध्ये दुरुस्ती आवश्यक आहे त्यांनी विहित मुदतीत संबंधित अर्ज सादर करावेत. माहूर तालुक्यातील सर्व पात्र नागरिकांनी या विशेष गहन पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत कायम राहील याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी अभिजित जगताप यांनी केले आहे.


0 टिप्पण्या