शिक्षक संघटनांचे माजी विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन
"विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, शिक्षकांना BLO च्या जाचातून मुक्त कराण्याची" - मागणी
राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : सध्या राज्यातील शिक्षकांना अध्यापन या मूळ कामापेक्षा BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) सारख्या अशैक्षणिक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुंपले जात आहे. या अतिरिक्त कामाच्या प्रचंड मानसिक तणावामुळे काही शिक्षकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे शिक्षक सतत शालाबाह्य कर्तव्यावर असल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या अतिशय गंभीर विषयावर आज राज्यातील विविध शिक्षक संघटना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे माजी विरोधी पक्षनेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने मांडलेल्या प्रमुख मागण्या याप्रमाणे एक शिक्षकी शाळेतील शिक्षक, तसेच गंभीर आजार व विशेष समस्या असणाऱ्या शिक्षकांना BLO कामातून तात्काळ वगळण्यात यावे., एका शाळेतून किती शिक्षक BLO म्हणून घ्यावेत यासंदर्भात स्पष्ट धोरण व मर्यादा ठरवावी,केवळ शिक्षकांनाच नव्हे तर शासनाच्या इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना BLO काम विभागून द्यावे, गावातील बेरोजगार युवकांना BLO म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी किंवा सदर काम सेतू केंद्रांमार्फत करून घ्यावे, TET पात्र शिक्षक व विद्यार्थी शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्यात,आगामी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न लावून धरून शिक्षकांना BLO च्या जाचातून कायमस्वरूपी मुक्त करावे.
यावेळी शिक्षकांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर आ. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी सौ. वसुमना पंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. शिक्षकांवरील अतिरिक्त ताण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्या याबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव, माजी अध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका चंदाताई वैरागडे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, मनपा झोन सभापती वैशाली चंदनखेडे, नगरसेवक सचिन कत्याल, सफिया तवांगर खान, गजानन डोईफोडे, कुणाल चहारे, राजू वासेकर आदी उपस्थित होते.
शिक्षक हे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांना अध्यापनापासून दूर ठेवणे म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. शासनाने याची तातडीने दखल घेऊन शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.


0 टिप्पण्या