Ticker

6/recent/ticker-posts

टेलिग्रामवरील टास्क शेअर मार्केटचे आमिष

ॲम्बुलन्स चालकाची 18.88 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी 

चंद्रपूर : टेलिग्रामवर "टास्क पूर्ण करा आणि डॉलरमध्ये गुंतवणूक करा" असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी भद्रावतीतील एका तरुणाची तब्बल 18 लाख 88 हजार 588 रुपये लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिंगुजी वार्ड येथील रहिवासी निखिल ऋषी बावणे (29) हा चांदा आर्डनन्स फॅक्टरीच्या हॉस्पिटलमधील ॲम्बुलन्सवर खाजगी वाहनचालक म्हणून काम करतो. 22 जानेवारी 2026 रोजी निखिलला टेलिग्रामवर 'मरिना स्मित' @Marina_smit_169 या आयडीवरून मेसेज आला. त्यात हॉटेल टू नाईट आणि डॉलरच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे सांगण्यात आले. सोबत `hllngtt.com` ही लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्यास सांगितले.

सुरुवातीला कमी रक्कम गुंतवल्यानंतर सायबर भामट्यांनी निखिलला आभासी स्क्रीनवर जास्त नफा झाल्याचे दाखवले. याला भुलून निखिलने आपल्या बँक ऑफ महाराष्ट्र, भद्रावती शाखा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच आई मंगला ऋषी बावणे यांच्या खात्यातून 3 फेब्रुवारी ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत 35 ऑनलाईन UPI ट्रान्सॅक्शनद्वारे 18,88,588 रुपये पाठवले.

नफ्यासह पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी खाते फ्रीज केले आणि आणखी पैसे मागितले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने निखिलने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

निखिलच्या तक्रारीवरून 15 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:12 वाजता भद्रावती पोलिसांनी अज्ञात टेलिग्राम आयडी धारकांविरुद्ध IT कायदा 2000 चे कलम 66(D) सह BNS 2023 चे कलम 318(4), 319(2) नुसार गुन्हा नोंदवला. 

फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सध्या 2 लाख 10 हजार 140 रुपये बँकेकडून होल्ड करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश्वर विठोबा पारधी यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ कपिल भोयर करत आहेत.

________________________________

पोलिसांचे आवाहन

टेलिग्राम, व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडियावर येणाऱ्या ऑनलाईन टास्क, शेअर मार्केट आणि क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि UPI आयडीवर पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन भद्रावती पोलिसांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या