प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर

भद्रावती :ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व आवश्यक शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देत उल्लेखनीय आरोग्यसेवा बजावल्याबद्दल ग्रामीण रुग्णालय, भद्रावतीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष कृष्णकुमार सिंग यांचा जिल्हा प्रशासन, चंद्रपूर यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला.

ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असताना डॉ. सिंग यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठ्या शहरांतील रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासू नये, यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर शस्त्रक्रिया सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून दिली.

डॉ. सिंग यांच्या कार्यकाळात हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिसेक्टमी, फिशर, हेमोरॉइड्स तसेच स्त्री व पुरुषांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया यांसह विविध किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना वेळेत व सुलभपणे उपचार मिळण्यास मदत झाली.

आरोग्यसेवा ही केवळ उपचार करण्यापुरती मर्यादित नसून ती माणसाच्या जीवनाशी जोडलेली सामाजिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या अडचणी समजून घेत त्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याच्या डॉ. सिंग यांच्या कार्याची जिल्हा प्रशासनाने घेतलेली दखल ही त्यांच्या सेवाभावाचा गौरव मानली जात आहे.

15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा प्रशासन, चंद्रपूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. पालकमंत्री अशोक उईके, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन डॉ. सिंग यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. डॉ. सिंग यांच्या या सन्मानामुळे ग्रामीण रुग्णालय, भद्रावतीच्या आरोग्यसेवेला देखील नवी प्रेरणा मिळाली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.