Ticker

6/recent/ticker-posts

आयुष्याचा शेवटचा प्रवासही व्हावा सन्मानाचा

आयुष्याचा शेवटचा प्रवासही व्हावा सन्मानाचा 
           निरोपाला यातनांचा प्रवास 

साकोली:- रवि भोंगाने 
       
          " मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता 
            असे म्हणण्याची प्रथा आहे, 
            जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही 
            हीच खरी व्यथा आहे " 

'जन्म-मृत्यू' हा सृष्टीचा नियमच आहे. तो आतापर्यंत या आधी कोणालाही चुकला नाही आणि समोरही कुणाला चूकणार नाही. स्मशानघाटाच्या वाटेने प्रत्येकालाच मागे पुढे जावे लागणार आहे. मृत्यू हा महान असून सर्वांसाठी समान आहे. मग तो राजा असो अथवा रंक. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. परंतु आयुष्याचा, जीवनाचा शेवटचा प्रवास सन्मानाचा व्हावा असे प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु मानवी जीवनाच्या शेवटच्या प्रवासाला निघतांना सुद्धा यातनांचा प्रवास करावा लागत असेल तर... स्मशानभूमीत तुटलेले गळके छत, चिखलमय जागा, बसायला पुरेसी जागा नाही, पाण्याची सोय नाही. अशी अवस्था साकोली तालुक्यातील अनेक गावाच्या स्मशानभूमीची आहे. निदान स्मशानघाटावर सुविधा देण्याची मागणी नागरिक करू लागले आहे. जीवनाचे सर्व प्लॅन एका क्षणात रद्द करण्याची ताकद ठेवणारा महारथी म्हणजे मृत्यू. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर मृत्यू म्हणजे जीवनाच्या शरीरातील सर्व जैविक प्रक्रियेच्या आणि जीवनाचे कायमचा अंत. या प्रक्रियेत शरीराचे कार्य थांबते. जगाच्या निरोप घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक निरोप मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र ग्रामीण भागातील स्मशानभूमीची अवस्था तर दूरच राहिली साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय बिकट झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर स्मशानभूमीची अवस्था बघून होत नाही. प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने निरोपालाही यातनांचा प्रवास लागत आहेत. स्मशानभूमीतील मुख्य शेडवर असलेले लोखंडी टिनपत्रे पूर्णपणे उडून गेल्यामुळे ते लंपास झालेले आहेत. परिसरातील पक्की फ्लोरिंगदेखील जागोजागी उखडलेली आहे. या सर्व दुर्दैवी प्रकारामुळे शोकाकुल कुटुंबांना आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नागरिकांना चिखलात आणि खडबडीत जागेवर  अंत्यविधी उरकण्याची लाजिरवाणी वेळ आलेली आहे. नगरपरिषदेने या स्मशानभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नूतनीकरणीसाठी प्रस्ताव पारित करून प्रशासनाकडे पाठवल्याची माहिती आहे. या प्रस्तावित कामांमध्ये नवीन आणि भक्कम शेडचे बांधकाम, पक्की समतल फ्लोरिंग, योग्य जलव्यवस्थापन तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा अंतर्भाव आहे. मात्र संतापजनक बाब अशी की, बराच कालावधी लोटूनही या कामासाठी एक रुपयाचाही निधी अद्याप मंजूर झाला नाही. परिणामी कागदावर असलेल्या या प्रस्तावाशी प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम जागेवर सुरू होऊ शकलेले नाही. स्मशानभूमीवर पावसाळ्यात डोक्यावर शेड नसल्यामुळे अंत्यविधी उरकवतांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते.
--------------------------------------------
नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर  माझी नाराजी आहे. स्मशानभूमीच्या परिसरात मजबूत व स्थायी शेड आणि इतर आवश्यक सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे आहे. लगतच्या कुंभली स्मशान घाटावर शेडची स्थिती थोडी जर्जर असली तरी किमान येथे पावसापासून संरक्षण होते. त्यामुळे नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी कुंभलीच्या घाटाचा आधार घ्यावा लागतो. शासनाकडून गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला निधी विनाविलंब तातडीने मंजूर करावा व ही सर्व कामे युद्ध पातळीवर मार्गी लावावी.

सुरेश संग्रामे.
सामाजिक कार्यकर्ता सेंदूरवाफा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या