SARD NGO व वनविभागाच्या सहकार्याने नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडला
भद्रावती प्रतिनिधी ✍️राजेश येसेकर
भद्रावती : शहरातील किल्ला वार्ड येथील रहिवासी रमेश गुंडावार यांच्या घरी दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण असा हत्ती सरडा (Indian Chameleon) आढळून आल्याची घटना घडली. घरात अचानक हा सरडा दिसताच गुंडावार यांनी तात्काळ SARD NGO, भद्रावती यांच्याशी संपर्क साधला.
बचाव पथकाला माहिती मिळताच अनुप येरणे, आशिष चहाकाटे, शैलेश पारेकर, श्रीपाद बाकरे, पंकज मूरकुटे आणि SARD Rescuer Team घटनास्थळी दाखल झाले. पथकाने हत्ती सरड्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
त्यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. किरण धानकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनरक्षक अमोल तिकट सर यांच्या सहकार्याने हत्ती सरड्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
हत्ती सरड्याविषयी माहिती
हत्ती सरड्याचे शास्त्रीय नाव *Chamaeleo zeylanicus* असून तो भारतातील स्थानिक गिरगिटाची एक प्रजाती आहे. महाराष्ट्रासह द्वीपकल्पीय भारतात त्याचा आढळ होतो. हा प्रामुख्याने झाडे व झुडपांवर राहणारा, दिवसा सक्रिय आणि कीटकभक्षी सरडा आहे.
त्याची वैशिष्ट्ये:
1. स्वतंत्रपणे हालचाल करणारे डोळे
2. लांब व वेगाने पुढे जाणारी जीभ
3. फांदी पकडण्यासाठी उपयुक्त गुंडाळलेली शेपटी
4. रंग बदलण्याची क्षमता - जो केवळ लपण्यासाठीच नव्हे तर तापमान व वर्तनासाठीही उपयोगी पडतो.
रमेश गुंडावार यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका दुर्मिळ जीवाचे प्राण वाचले असून सर्वत्र त्यांच्या कृतीचे कौतुक होत आहे.
______________________________
वनविभागाचे आवाहन
अशा प्रकारचे वन्यजीव आपल्या परिसरात आढळल्यास त्यांना इजा न करता किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता थेट वनविभाग किंवा अधिकृत वन्यजीव बचाव पथकाला माहिती द्यावी. त्यांचे सुरक्षित बचाव व पुनर्स्थापन हेच त्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे आहे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


0 टिप्पण्या