• देवरी/गोंदी वनक्षेत्रातील घटना
• पालांदूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
भंडारा :- शेत जमिनीच्या जुन्या वादावरून पुतण्याने काकुची हत्या केल्याचा निंदनीय प्रकार पालांदूर पोलिसांच्या सजगतेने उघडकीस आला. देवला किसन गेडाम रा. देवरी/गोंदी ह्या ५६ वर्षीय महिलेचा मृतदेह २ ऑगस्ट रोजी देवरी-किटाडी रस्त्याच्या कडेला आढळला होता. सरपंच उपेंद्र शेंडे यांचे फिर्यादी वरून पालांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. उत्तरीय परीक्षण करणाऱ्या वैद्यकिय चमुशी चर्चेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांनी तपास केला असता पुतण्याने नाक, तोंड व गळा दाबून काकुची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपी पुतण्याने नाव स्वप्नील अभिमन गेडाम(३१) रा. किटाडी, तालुका लाखनी असे आहे.
देवलाबाई यांचे किटाडी येथील गेडाम परिवारात विवाह समारंभ पार पडला होता. विवाहानंतर २-३ वर्षांनी पतीचे निधन झाल्यामुळे देवलाबाई माहेरी देवरी/गोंदी येथे राहत होती. मोलमजुरी व वनक्षेत्रातील रानभाज्या गोळा करून विक्री करून आपला चरितार्थ चालवित असे. पती च्या मृत्यूनंतर सासरकडील सामुहिक शेतजमिनीत देवलाबाई चे नाव ७/१२ वर दर्ज करण्यात आले होते. या सामूहिक शेतीवरून देवलाबाई चे सासरे व त्याचा चुलतभाऊ अभिमन जयराम गेडाम यांचेत जुना वाद होता. देवलाबाई ला मूलबाळ नसल्यामुळे तिचा चूलत सासरा शेतीत अधिकार देण्यास तयार नसल्यामुळे वाद न्यायप्रविष्ट आहे. घटनेच्या दिवशी(ता.१) स्वप्नील याला देवरी-किटाडी मार्गावरील वनव्याप्त परिसरात देवलाबाई मशरूम(सात्या) गोळा करीत असल्याचे दिसून आले. स्वप्नील ने तिच्याकडे शेतीच्या वादाबाबद विचारणा केली असता दोघात कडाक्याचे भांडण झाले. राग अनावर होऊन स्वप्नील ने तिला मारहाण करून जमिनीवर पाडले आणि तिचे नाक, तोंड व गळा दाबून हत्या केली. पण घटनेच्या दिवशी या बाबद खुलासा झाला नाही.
२ ऑगस्ट रोजी देवरी-किटाडी मार्गावर वनव्याप्त परिसरात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती सरपंच उपेंद्र शेंडे यांनी सायंकाळी ६:०० वाजता पालांदूर पोलिस ठाण्यात दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे अधिनस्त कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून मृतदेहाचे निरीक्षण केले असता काही संशयास्पद बाबी दिसून आल्या. पण पालांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंह यांना माहिती देऊन संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्याचा चंग बांधला व मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी त्यानंतर सामान्य रुग्णालय भंडारा आणि शेवटी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे स्वतः घेऊन गेले. शवविच्छेदन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मौखिक चर्चेवरून ही स्वाभाविक मृत्यू नसून घातपात असल्याचे समजल्याने वेगाने पोलिस तपास करण्यात आला. त्यात आरोपी स्वप्नील २ दिवसापूर्वी देवलाबाई किटाडी गावात दिसणार नाही. त्यामुळे शेतीचा जुना वाद संपुष्टात येईल अशी चर्चा केल्याचे गुप्त माहिती वरून पालांदूर पोलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन पोलिसीखाक्या दाखवताच पुतण्या स्वप्नील गेडाम याने काकू देवलाबाई ची हत्या केल्याचे कबूल केल्याने त्याचे विरुद्ध पालांदुर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार विरसेन चहांदे, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मडावी, सहाय्यक फौजदार ओमप्रकाश केवट, पोलिस शिपाई नावेद पठाण, भालचंद्र अण्डेल तपास करीत आहेत. हत्येचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आल्याने पालांदूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


0 टिप्पण्या