जागतिक पर्यावरण दिनी होणार शुभारंभ
'ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह' ही लोकचळवळ व्हावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार
हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
अकोला : पर्यावरणीय बदल व सततच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्ह्यात पावसाळ्यात 'ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह' या उपक्रमातून १० लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. विविध विभागांसह स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रांतील संघटना, तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. हा उपक्रम ही लोकचळवळ व्हावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज केले.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, मागील काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सरासरी 44 ते 45 सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. गेल्या वर्षी नोंदवलेल्या सरासरी तापमानापेक्षा यावेळचे तापमान जास्त असल्याचे दिसून येते. एकंदर पर्यावरणीय बदलामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून भविष्यात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हा वाढते तापमान कमी करण्याचा उपाय आहे. जगातील पर्यावरण तज्ज्ञांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणावर घनवन अर्थात 'मियावाकी' पद्धतीने वृक्षारोपण केल्यास निश्चितच तापमानवाढीस काही प्रमाणात आळा बसू शकेल. त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 'ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह' राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. _जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि. ५ जून रोजी उपक्रमाची सुरूवात होईल._
'मियावाकी' व 'स्वस्तिक' पद्धतीने वृक्षारोपण
त्यानुसार येत्या पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात किमान १० लक्ष वृक्षलागवड घनवन (मियावाकी) अथवा स्वस्तिक लागवड पद्धतीद्वारे करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांच्या मोकळ्या जागांवर, कार्यालयांच्या परिसरात, ग्रामपंचायत तसेच महापालिका नगरपालिका क्षेत्रात, शासकीय जमिनीवर विस्तृतपणे अशा प्रकारे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.
सर्व विभागप्रमुखांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून जागा निश्चित कराव्यात व तालुकानिहाय वृक्ष लागवडीचे ध्येय साध्य करावे. रोपांची उपलब्धता वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने करावी. वृक्ष लागवडीसाठी जमीन तयार करणे, आवश्यक असल्यास कुंपण, पाण्याची व्यवस्था यासाठी पंधरावा वित्त आयोग, सीएसआर निधी, कर्मचारी, लोकसहभाग याद्वारे निधी उपलब्धतेची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना दिले आहेत.
सर्वांचा सक्रिय सहभाग व प्रभावी इच्छाशक्तीद्वारे हा उपक्रम नक्कीच यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवी संस्था, संघटना, नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या