चित्रा न्युज ब्युरो
उल्हासनगर: जगविख्यात गोल्डमॅन आणि "सुशा अंडरवॉटर गोल्ड मायनिंग" कंपनीचे मालक रोहित पिसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती श्रद्धा व्यक्त करत, उल्हासनगरातील तक्षशिला महाविद्यालयाला 6 फूट उंच सोन्याची प्रतिमा भेट देण्याची घोषणा केली आहे.
बुद्धधातू आणि सोन्याचे विशेष महत्त्व
या घोषणेदरम्यान रोहित पिसाळ यांनी सोन्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. "सोनं हे बुद्धधातू म्हणून ओळखलं जातं. त्याचा वारसा हा गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जोडला गेला आहे," असे त्यांनी सांगितले. पाण्याखालील सोन्याचे उत्खनन करणाऱ्या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या कंपनीचे नेतृत्व करणारे पिसाळ हे कट्टर आंबेडकरवादी असून, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
आंबेडकरी जनतेला आर्थिक संपन्नतेचा संदेश
पिसाळ यांनी आंबेडकरी जनतेला आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्याचे आवाहन केले. "आंबेडकरी समाजाने आता केवळ सामाजिक चळवळीपुरते मर्यादित न राहता आर्थिक प्रगतीसाठीही पाऊल उचलण्याची गरज आहे. आर्थिक सक्षमीकरणाशिवाय समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळू शकणार नाही," असे ते म्हणाले.
डॉ. आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प
तक्षशिला महाविद्यालयात सोन्याच्या प्रतिमेची स्थापना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी करण्यात येणार आहे. ही प्रतिमा त्यांच्या संघर्ष, बुद्धिमत्ता आणि समाजासाठी केलेल्या अमूल्य योगदानाची आठवण करून देईल.
उल्हासनगरातील तक्षशिला महाविद्यालयासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असून, या उपक्रमामुळे डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर अधिक जोमाने होईल, असा विश्वास आंबेडकरी समाज व्यक्त करत आहे.
0 टिप्पण्या