Ticker

6/recent/ticker-posts

स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी मोठी मागणी: महाराष्ट्र गट-ब आणि गट-क पदांसाठी जागा वाढविण्याची अॅड. दिलीप सोपल यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती


चित्रा न्युज ब्युरो

सोलापूर :-महाराष्ट्र गट-ब व गट-क (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024 संदर्भातील जाहिरातीमध्ये अत्यल्प पदसंख्या ठेवण्यात आल्याने स्पर्धा परीक्षार्थ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर बार्शीचे आमदार अॅड. दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांना विनंतीपत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीकडे तातडीने लक्ष घालून पदसंख्येत वाढ करण्याची मागणी केली आहे.


गट-ब आणि गट-क सेवा पदसंख्या


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहीर केलेल्या गट-ब आणि गट-क सेवा पदांच्या जाहिरातीमध्ये अत्यल्प पदसंख्या ठेवण्यात आली आहे:


गट-ब (अराजपत्रित) पदसंख्या:

सहायक कक्ष अधिकारी (ASO): 55 पदे

राज्यकर निरीक्षक (STI): 209 पदे

पोलीस उपनिरीक्षक (PSI): 216 पदे

दुय्यम निबंधक (SR): 00 पदे

एकूण: 480 पदे


गट-क (अराजपत्रित) पदसंख्या:

लिपिक टंकलेखक: 803 पदे

कर सहायक (TA): 482 पदे

राज्य उत्पादन शुल्क (Excise): 00 पदे

तांत्रिक सहाय्यक (TA): 94 पदे

उद्योग निरीक्षक: 39 पदे


सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI): 00 पदे

एकूण: 1,333 पदे


अॅड. दिलीप सोपल यांच्या मते, परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 ते 4 लाखांपर्यंत असते. मात्र, यंदाच्या जाहिरातीत पदसंख्या खूप कमी आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संधीवर विपरीत परिणाम होणार आहे.


RTIच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत:


PSI: 2,959 रिक्त पदे

STI: 963 रिक्त पदे

SR: 40 रिक्त पदे

Tax Assistant: 1,537 रिक्त पदे


लिपिक पदांबाबत सरकारच्या घोषणांचे पालन नाही


सरकारने MPSC अंतर्गत 12,000 लिपिक पदे भरण्याचे आश्वासन दिले होते. यातील 7,000 पदांची भरती पहिल्या टप्प्यात सुरू आहे. उर्वरित 5,000 पदांची भरती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.


जाहिरात उशिराने प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान


गट-ब आणि गट-क सेवा पूर्व परीक्षेच्या जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी तब्बल 9 महिने उशीर झाला. या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले असून, या कालावधीत त्यांना नोकरीसाठी संधी उपलब्ध होऊ शकली नाही.


आमदार अॅड. दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सर्व रिक्त पदांची यादी तयार करून ती तत्काळ भरावीत, तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन जागावाढ करण्याचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला द्यावेत, अशी विनंती केली आहे.


संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थ्यांना मोठ्या संख्येने संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या