चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : भटके मुक्त समाजावर शासनातर्फे आणि खाजगी संस्था तर्फे झालेल्या अभ्यासाअंती सांगितलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. त्यात शिक्षण, रोजगार, आरोग्य, घरकुल, गुन्हेगारी कलंक पासून मुक्ती, यासारखे महत्त्वाचे मुद्दे होते. समकालातही हेच मुद्दे पूर्ण न झाल्याचे दिसते. आगामी काळात मात्र भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी सक्तीचे शिक्षण योजना राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. नारायण भोसले यांनी केले. ते कर्वे समाजसेवा संस्था पुणे व ग्रामीण विकास केंद्र आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चा सत्रात ते बोलत होते.
भटक्या विमुक्त समाजातील लोकांकडे रहिवासी दाखले, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक अशी नागरिकत्वाची पुरावे नसल्यामुळे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. ही वस्तुस्थितीही डॉ. भोसले यांनी सांगितले.
त्याचबरोबर त्यांच्या आई-वडिलांच्या रोजगारांचा प्रश्नही सरकार आणि सीएसआर यांच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो असे ते म्हणाले.
भटके विमुक्त जाती-जमाती: सद्यस्थिती- आव्हाने आणि विकासाची वाटचाल या विषयावर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. समाज कल्याण विभागाचे नियोजन उपायुक्त विजयकुमार गायकवाड, कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक प्रा.डॉ.महेश ठाकूर, प्रा.डॉ.शर्मिला रामटेके, प्रा. चयन पारधी, ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमा जाधव, मॅनेजिंग कमिटीच्या सदस्या शिल्पा पाठक, डॉ.सई ठाकूर ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड. डॉ.अरुण जाधव, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक प्रा.डॉ.महेश ठाकूर म्हणाले की, भटक्या विमुक्त जाती- जमातींच्या विविध प्रश्नांवर आपण इतकी वर्ष नुसती चर्चा करतोय, परंतु प्रत्यक्ष काम कधी करणार? हा खरा प्रश्न आहे. भटक्या जाती- जमातींची शिबिरे घेऊन त्यांना नागरिकत्वाचे पुरावे देता येतील. तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करणार यावर कृती कार्यक्रम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अशा कार्यक्रमांसाठी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमा जाधव यांनी यावेळी या परिषदेची भूमिका विशद केली. त्या म्हणाल्या की, प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करणे हे भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या पाचवीलाच पुजलेले आहे. आदिवासी आणि भटक्या विमुक्त समाजाला आपला मुक्काम पोस्ट शोधण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, नागरिकत्वाचे पुरावे, रोजगार, उपजीविका असे असंख्य प्रश्न असून, त्यावर खऱ्या अर्थाने काम करण्याची गरज आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र व कर्वे समाज सेवा संस्था संयुक्तपणे प्रयत्न करेल.
ग्रामीण विकास केंद्राच्या नवीन माहितीपत्रकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कर्वे समाज सेवा संस्थेच्या प्रवेशद्वारापासून, सरदार पटेल सभागृहापर्यंत भटक्या विमुक्त समाजातील पारंपारिक वासुदेव, गोंधळी, पिंगळा जोशी, नाथपंथी डवरी गोसावी, स्मशान जोगी, या लोककलावंतासह उपस्थित मान्यवरांची वाजत गाजत रॅली निघाली होती. मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाची उद्देशिका तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व दीप प्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन झाले.
दुसऱ्या सत्रामध्ये भटक्या विमुक्तांचे मूलभूत अधिकार, नागरिकत्व, आरोग्य, शिक्षण, आरक्षण या विषयावर चर्चा झाली. त्यामध्ये विनोद शेंडे, लता सावंत, संदीप आखाडे, डॉ.प्रदिप जरे यांनी आपला सहभाग नोंदवला. डॉ.शर्मिला रामटेके या चर्चासत्राचे अध्यक्ष होत्या. बापू ओहोळ यांनी समतेच्या वाटेवर हे चळवळीचे गीत तर संतोष चव्हाण यांनी गवळण सादर केली.
दैनंदिन आयुष्य भटक्या विमुक्तांचेमहिलांचे दैनंदिन आयुष्य या विषयावरील चर्चासत्रात द्वारका पवार, मुमताज शेख, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर भटक्या विमुकतांच्या उपजीविका, रोजगार, उद्योग, महामंडळे भटक्या विमुक्तांचे प्रतिनिधित्व या विषयावरील परिसंवादात मेहबूबा छप्परबंद, ॲड अरुण जाधव, प्रदीप मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ प्रकाश यादव हे या चर्चासत्राचे अध्यक्ष होते. भटके विमुक्त विकासाचा कृती आराखडा या गट चर्चेमध्ये संदीप आखाडे आणि प्रा.चयन पारधी यांनी आपला सहभाग नोंदवला. कृती आराखडा सादरीकरण व समारोप कर्वे समाजसेवा संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉ. महेश ठाकूर, मुमताज शेख, उमा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी सचिन भिंगारदिवे, बापू ओहोळ, भगवान राऊत, विशाल पवार संतोष चव्हाण ,ऋषिकेश गायकवाड राजू शिंदे, विशाल कांबळे, संस्कृती मते, यशराज कदम, पायल अंगारखे, अनिकेत लोखंडे, ज्योती सैनी, रुपाली खमसे, प्रसाद नेवसे, चेतना कुडले, स्वप्नाली चव्हाण, रविकिरण गरे, राजदीप देशमुख, करण सावळकर, विशाल राठोड, आदेश सांगळे, रवी लाड, सायली पवार यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या