Ticker

6/recent/ticker-posts

शेती नसतांनाही खोटा सातबारा दाखवून तीस आदिवासींची करोडोची फसवणूक

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपुर : शेतीचा खोटा सातबारा दाखवून 30 आदिवासींचे नावावर कर्ज उचलून करोडोची फसवणूक केल्याची तक्रार माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी आज चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचेकडे केली. मजूरी करीत असलेल्या कोलाम समाज बांधवांच्या नावे बनावट सातबारा बनवून गडचांदुर येथील ग्रामीण बँक मधून आदिवासींच्या नावाने कर्ज उचलून फसवणूक करण्यात आली असून या आदिवासींची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दोषीवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी आज दिनांक 31 जुलै रोजी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर तथा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.

या प्रकरणात बँक मार्फत कर्ज वितरण प्रक्रियेत अनेक व्यक्तीचा सहभाग असल्याचे दिसून येत असल्याने याचीही चौकशी करण्यात यावी ही मागणी सुध्दा करण्यात आली आहे. या प्रकरणात अंदाजे सुमारे एक ते दिड कोटी रुपयांची उचल या आदिवासींच्या नावे बनावट सातबारा तयार करून केली आहे. विशेष म्हणजे या आदिवासी कोलाम बांधवाकडे शेतीच नाही. राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदुर ग्रामीण बँकेतील हा घोटाळा असल्याचे निदर्शनास आले आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना युवा उद्योजक निलेश ताजणे, भाजपा माजी शहर अध्यक्ष अनिल कौरासे, शुभम थिपे यांच्यासह कोरपणा व जिवती तालुक्यातील आदिवासी कोलाम बांधव उपस्थित होते. याबाबत आदिवासी बांधवानी गडचांदुर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या