चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :- "संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार, स्वातंत्र्य आणि प्रगतीचा मार्ग दिला आहे. खऱ्या अर्थाने प्रगती साधायची असेल, तर विशेषतः शोषित, वंचित आणि दलित समाजाने संविधानाचा अभ्यास आवर्जून केला पाहिजे," असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या आयुष्यमती प्रा. सुषमा म्हसके यांनी केले. त्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र आयोजित ७६व्या संविधान दिन कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. विजय जाधव होते.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर सभागृहात बुद्धवंदना घेण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन संस्थेचे उपाध्यक्ष नितीन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पुढे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी पाहुण्यांचा तसेच संस्थेचा यथोचित परिचय करून दिला.
याप्रसंगी विचारपीठावर प्रा. सुषमा म्हस्के (जितेंद्र चव्हाण कॉलेज ऑफ लॉ), आयु. रवींद्र आंबेकर (ज्येष्ठ पत्रकार), संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष नितीन सोनावणे, सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव आणि चिटणीस रत्नाकर रिपोटे उपस्थित होते.
प्रा. म्हसके म्हणाल्या, "भारत हा विविध पंथ, धर्म, भाषा आणि जातींचा देश आहे. या सर्वांना न्याय देणारी प्रभावी राज्यघटना घडविण्याची ऐतिहासिक जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पार पाडली. घटनेच्या मसुदा समितीत त्यांना सामावून घेण्यास सुरुवातीला विरोध झाला, परंतु 32 पदव्या प्राप्त असा विद्वान त्या काळात जगात नव्हता. त्यामुळेच सभासदांच्या संमतीने घटनेची अध्यक्षपदी त्यांची निवड झाली."
त्या पुढे म्हणाल्या, "समितीत अनेक सभासद होते, मात्र विविध कारणांमुळे अनेकजण बाजूला झाले. परिणामी संपूर्ण जबाबदारी एकट्या बाबासाहेबांनी निर्भयपणे पेलली आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित भक्कम संविधान देशाला दिले."
संविधानामुळे देशातील प्रत्येक घटकाला न्याय मिळू लागल्याचे सांगत प्रा. म्हसके म्हणाल्या, "गेल्या 100 वर्षांत न दिसणारे परिवर्तन विशेषतः शोषित, वंचित आणि दलित समाजात संविधानामुळे घडून आले आहे. संविधान अतिशय उदात्त असून ते सर्वांना न्याय देते."
शेवटी त्यांनी आवाहन केले, "संविधानाचा आदर करा, आणि ते जीवापलीकडे जपले पाहिजे कारण तेच आपल्या प्रगतीचे सर्वात मोठे शस्त्र आहे."
प्रमुख वक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार आयु. रवींद्र आंबेकर यांनी भाषणात म्हटले, "आज काही राजकारण्यांकडून संविधान संकटात असल्याचे चित्र निर्माण केले जाते. अगदी सत्ताधारी युतीतील काहीजणही संविधानावर टीका करतात. मात्र संविधानाची खरी जाण असलेले आणि त्याचे मूल्य समजून घेणारे लोक अशा टीकेला ठाम विरोध करतील. या विरोधात आंबेडकरी समाज नक्कीच एकवटेल."
ते पुढे म्हणाले, "संविधानामुळे आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि मूलभूत हक्क मिळाले आहेत. महागाई भत्ता, बोनस, प्रसूती रजा, कामगारांचे कामाचे तास, राखीव जागा अशा अनेक सुविधा संविधानानेच समाजाला दिल्या आहेत. हे सकारात्मक बदल समाजात पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे." समता आणि समरता यातील फरक स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, "पोस्टर लावण्यासाठी भाड्याने लोक आणावे लागतात म्हणजे त्या विचारांची पायाभरणी कमकुवत आहे. समाजाचा विचारप्रवाह आता प्रगल्भ होत आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय समस्या सुटायला हव्यात."
ते पुढे म्हणाले की, "जोपर्यंत संविधान लोकांना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय देत आहे, तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही. उलट, समाजातील इतर घटकांना या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे."
भाषणाच्या शेवटी आंबेकर म्हणाले, "डॉ. बाबासाहेबांना मुद्दाम दलितांचे नेते' म्हणून सीमित करण्याचा प्रयत्न होतो. हा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. परिवर्तनवादी प्रवाहात सर्व समाजघटकांना सामील करणे ही एकत्रित जबाबदारी आहे."
अध्यक्षीय भाषणात आयु. विजय जाधव यांनी सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "आज संविधानातील प्रत्येक कलमावर विविध स्तरांवर मोडतोड होत आहे. दलित आणि वंचित समाजाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आपल्या समाजाचा खऱ्या अर्थाने कोणीही 'वाली' आज उरलेला नाही; अनेक जण फक्त स्वार्थ साधण्यासाठी लाचार बनत आहेत." ते पुढे म्हणाले, "काही घटक बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आदर करत नाहीत; आणि आपल्या समाजातील काही लोक त्यांच्या मागे जातात, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे."
भाषणाच्या शेवटी त्यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष सदाशिव गांगुर्डे, विश्वस्त सुनील वाघ, संजय जाधव, नीना हरिनामे, डॉ. वनसे (होमिओपॅथिक तज्ज्ञ), प्राध्यापक दीपक म्हस्के, उद्योजक विवेक वाघ, आयु. ज्योत्स्ना दिघे - उबाटा (माजी नगरसेविका), उपशाखा प्रमुख अर्चना बच्छाव (उबाटा) तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या