Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकाऱ्यांना अनुसूचित जमाती आयोगाकडून सीटिंग नोटीस – आरोग्य असुविधेमुळे दोन भावंडांच्या मृत्यू प्रकरणात गंभीर दखल!

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील पत्तीगांव येथे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे व मूलभूत आरोग्य सुविधांच्या अभावामुळे सप्टेंबर 2024 मध्ये वेलादी आदिवासी कुटुंबातील दोन सख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना प्रकाशात आली होती. अत्यंत दुदैवी म्हणजे, मृतदेह वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध नसल्याने त्या दोन्ही बालकांना खांद्यावर उचलून त्यांच्या आई-वडिलांना तब्बल 15 किलोमीटर जंगलमार्गाने चालत घरी न्यावे लागले होते.

ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण आदिवासी समाजासह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी आणि जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी थेट राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST), दिल्ली येथे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत NCST ने जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे ‘सीटिंग नोटीस’ पाठविले आहे. त्यामुळे या प्रकरणावर कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी 8 महिन्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना घटनेचा खुलासा करणे संदर्भात नोटीस प्राप्त झाला होता. आता थेट दिल्ली येथे आयोगाने 19 डिसेंबर 2025 बैठकी करिता जिल्हाधिकारी यांना बोलविले असल्याची नोटीस जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाली आहे.
आजाद समाज पार्टीने या घटनेत—
▪️ पीडित आदिवासी कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई,
▪️ जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई,
▪️ गावातील पुजाऱ्यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण आयोजित करणे,
▪️ आदिवासी भागात विशेष योजनेखाली वैद्यकीय सुविधा, वाहतूक व प्रसूती केंद्रांची उपलब्धता
या प्रमुख मागण्या केल्या होत्या.

आता NCST ने नोटीस बजावल्यामुळे या प्रकरणातील सत्य परिस्थितीपुढे येईल का? दोषी कोण ठरेल? पीडितांना न्याय मिळेल का? तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा पवित्रा नेमका काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

ही घटना आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेची दयनीय स्थिती उघड करणारी असून शासन-प्रशासनासमोर मोठा प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या