रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:- अलीकडे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे गुणवत्ता पूर्ण होऊ लागलेले आहे. खाजगी शाळेला टक्कर देत जिल्हा परिषद शाळा टॉपर ठरत आहेत. या शाळांमधील विद्यार्थी अनेक परीक्षेत प्राविण्य प्राप्त करून यश संपादन करीत आहे. परंतु एवढे सर्व असतांना जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्ग खोल्यांची वाणवा भासत आहे. राजकीय पुढारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना गैरसोय जाणवू लागली आहे. सध्या साकोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा नामांकित ठरत आलेली आहे. शाळेची गुणवत्ता कायम असल्याने खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषदकडे शाळांकडे वाढू लागला आहे. परंतु वर्ग खोल्यांची उणीव असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.१९८६ या वर्षी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी जिल्हा परिषद हायस्कूल वर्ग खोलीचा श्री गणेशा केल्याची माहिती समोर येत आहे. आज या घटनेला ४० वर्षे झाले. परंतु त्यानंतर एक नवीन वर्ग खोलीसुद्धा अद्याप पर्यंत निर्माण होऊ शकली नाही. शाळेच्यावतीने वर्ग खोल्यासाठी निवेदनावर निवेदन देण्यात आले. परंतु याकडे पाहिजे तसे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. ४० वर्षांपूर्वीच्या जुन्याच वर्ग खोल्यात विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. पण वर्ग खोल्यांचा अभाव असल्याने मर्यादित संख्येत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशापासून वंचित राहत आहे. वर्ग खोल्यांची मागणी पूर्ण झाल्यास गुणवत्ता शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रवेश देता येईल आणि पालकांचे समाधानही करता येईल.
_______________________________________________
९ शिक्षकांच्या भरवशावर जिल्हा परिषद शाळेचा डोलारा
सध्या साकोली तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कूल शाळा पुन्हा प्रकाशझोतात आलेली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाने या शाळेने पालकांचे लक्ष वेधले. परंतु सध्या या शाळेचा डोलारा केवळ ९ शिक्षक आणि एका मुख्याध्यापकावर आहे. ५ ते १० वर्ग असलेल्या या शाळेत फुल स्ट्रेंथ आहे. सदर शाळेत एकूण शिक्षकांची २१ पदे मंजूर आहेत. शाळेची गुणवत्ता पाहता शिक्षण विभागाने या शाळेला या आधीच शिक्षक पुरविणे आवश्यक होते. मात्र याकडे शिक्षण विभाग टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे. शिक्षकांची वाणवा असल्याने घड्याळी तासिका शिक्षक या शाळेला ठेवावे लागतात. अल्पशा वेतनात असलेल्या या शिक्षकांना चार चार महिने त्यांच्या घड्याळी तासिकाचे वेतनही मिळत नाही. एकीकडे जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या दर्जा सुधारत असतांना शिक्षण विभाग शिक्षक देण्यास का टाळाटाळ करीत आहे असा सवाल शाळा व्यवस्थापन समितीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समोर केला आहे. पुढच्या सत्रापर्यंत या शाळेला शिक्षक पुरविण्यात यावे अन्यथा साकोली आणि भंडारा शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर फार मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा मानस जिल्हा परिषद हायस्कूल शाळा साकोली येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे.


0 टिप्पण्या