गोंडउमरी येथील घटना; साकोली पोलिसांची कारवाई
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:- तालुक्यातील गोंडउमरी परीसरात पेट्रोलींग सुरू असताना जमावाला शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करणा-या पोलीस कर्मचाऱ्यांना काही इसमांतर्फे मारहाण व शिवीगाळ प्रकरणी साकोलीचे पोलीस निरीक्षक एम.पी.आचरेकर यांनी तातडीने एक्शन घेत शुक्रवार २६ जूनला सात आरोपींना साकोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.
साकोली पोलीस ठाण्यातील पोलीस नायक सचिन कापगते हे दि.१५ जूनला रात्री ९ वाजता दरम्यान पोलीस हवालदार दिनेश तिजारे यांच्यासोबत पोलीस दुरक्षेत्र गोंडउमरी परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोंडउमरी येथील जावेंद्र बोरकर यांचे दुकानासमोर १५ ते २० लोक जमा होवुन भांडण करीत शिवीगाळ करीत आहेत.या माहीतीवरून त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये,याकरीता तात्काळ पोलीस नायक सचिन कापगते व हवालदार दिनेश तिजारे हे जावेंद्र बोरकर यांच्या दुकानासमोर गेले.तेथे लोकांची गर्दी जमलेली होती.गर्दीत जमलेले ईसम नामे विश्वनाथ परसराम चांदेवार,अविनाश जिवन चांदेवार,जिवन परसराम चांदेवार,अरूण कोंडू कमलेकर, शशांक निताराम दोनोडे,पराग निताराम दोनोडे, राजु कोंडू कमलेकर व एक विधीसंघर्षित बालक सर्व रा.गोंडउमरी हे भांडण करीत होते. तेव्हा पोलीसांनी त्यांना भांडण करू नका व आपआपल्या घरी निघून जा म्हणून समजविण्याचा प्रयत्न केला.परंतु गर्दीत जमलेले इसम हे पोलीसांचे काहीच ऐकण्यास तयार नव्हते. उलट त्यांनी पोलीसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस नायक सचिन कापगते यांच्या तक्रारीवर पोलीस ठाणे साकोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या सातही इसमांना पोलीसांनी अटक केली आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र राऊत हे करीत आहेत.
--------------------------------------
"कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी अभद्र व्यवहार करीत शिवीगाळ करीत मारहाण करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापुढे अशा घटनांवर पोलीस आपला खाकीचा हिसका दाखवेल. खाकी गणवेशाला जो स्पर्श करेल त्यांची पोलीस प्रशासन हयगय करणार नाही.शासकीय नियम तोडणा-यांना हा कडक इशारा आहे"
एम.पी.आचरेकर
पोलीस निरीक्षक साकोली.
--------------------------------------


0 टिप्पण्या