चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड: हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्र. ०१ (तरोडा-सांगवी) व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ नगरी, सांगवी येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी *महापौर सौ.कविता संतोष मुळे* आणि *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांची प्रमुख उपस्थिती होती.
"प्रत्येक घराच्या परिसरात किमान एक झाड आणि शेताच्या बांधावर वृक्षवल्ली लावून समृद्धी फुलवा," हा स्व.वसंतराव नाईक यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी सांगितले की, सदरील वृक्षलागवड १०० दिवसांच्या विशेष अभियानाचा भाग असून पावसाअभावी हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता तो पूर्ण करण्यात येत आहे. लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाचे किमान एक वर्ष संगोपन करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी. वृक्षसंवर्धनामुळे भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम कमी करण्यास निश्चितच मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे पालिका आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांनी 'हरित नांदेड'चा संकल्प व्यक्त करत महानगरपालिका क्षेत्रात किमान २५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा, उद्याने व रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, माजी उपमहापौर तथा नगरसेवक सतीश देशमुख, उद्यान अधीक्षक तथा क्षेत्रिय अधिकारी डॉ.फरतुल्ला मिर्झा बेग, क्षेत्रिय अधिकारनी निलावती डावरे, रमेश चवरे, रावण सोनसळे, राजेश जाधव, संतोष मुळे, गजानन देशमुख, सरस्वती राऊत, वृक्ष मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष मुगटकर, संतोष जिंतुरकर, श्याम कानोटे, राजू जोरवर, रमेश ढोले, शिवकांता स्वामी, सुरेखा टाकळीकर तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल तिडके यांनी केले.


0 टिप्पण्या