रंग बदलले छत्र्यांचे जरी,
ते सुवर्ण दिवस आठवतात,
त्या एका काळ्या छत्रीमध्ये,
किती पावसाळे साठवतात!
आजकाल बाजारात डोळे दिपवणारे रंग, नवनवीन डिझाइन्स आणि खिशात सहज मावतील अशा ‘थ्री-फोल्ड’ छत्र्यांची गर्दी झालीये. कपाटाच्या कोपऱ्यात शांत बसून मी हे सगळं पाहत असते आणि मला माझे ते सुवर्णदिवस आठवतात. होय, मी तेच जुन्या काळातलं घराण्याचं वैभव... तुमची ‘ती जुनी काळी छत्री!’ माझं रूप साधं, अंगावर जाड काळं कापड आणि मजबूत लोखंडी ताणलेले आकडे. पण माझी प्रतिष्ठा काही वेगळीच होती. अख्ख्या घरात मी एकटीच असायचे, त्यामुळे पावसाळा जवळ आला की घरातील प्रत्येकाच्या नजरा माझ्याकडे मोठ्या आशेने लागलेल्या असायच्या.
माझ्या नजरेतून पाहिलेला तो गावचा पाऊस आणि त्या पावसाने जोडलेलं कुटुंब मी कधीच विसरू शकत नाही. हल्लीच्या छत्र्या एका माणसालाही नीट भिजण्यापासून वाचवू शकत नाहीत, पण माझ्या छायेत मात्र अख्खं कुटुंब सुरक्षित असायचं. शाळेत जाणारी दोन मुलं आणि त्यांना सोडवायला निघालेले बाबा, अशा तिघांना मी माझ्या पंखांखाली कसं अॅडजस्ट करायचे, हे माझं मलाच ठाऊक! त्या गडबडीत कोणाचा तरी एक खांदा नेहमी पावसात भिजायचा, पण त्या भिजण्यातही एक वेगळाच जिव्हाळा होता. एकमेकांना चिकटून चालताना होणाऱ्या त्या गप्पा आणि मुलांचा तो निखळ आनंद मी अगदी जवळून अनुभवला आहे.
वेळप्रसंगी मी फक्त पावसापासून रक्षण करणारी छत्री नव्हते, तर घराबाहेर पडताना आजोबांची काठी व्हायचे, कधी बाजारातून आणलेल्या भाजीची पिशवी अडकवण्याचं साधन व्हायचे, तर कधी लहान मुलांची बंदूक व्हायचे. पाऊस संपला की मला उघडून अंगणात सुकवायला ठेवलं जायचं. तेव्हा अंगणातल्या इतर वस्तूही माझ्याकडे आदराने पाहायच्या. आज काळ बदललाय, माणसांकडे प्रत्येकाची स्वतंत्र, रंगीबेरंगी छत्री आलीये. पण त्या छत्र्यांसोबत माणसांची मनंही स्वतंत्र झाली आहेत. रंग बदलणाऱ्या आणि एकाच सीझनमध्ये साथ सोडणाऱ्या या फॅन्सी छत्र्यांच्या दुनियेत, माझ्यासारख्या काळ्या छत्रीने मात्र कित्येक नाती आणि आठवणी आजही घट्ट धरून ठेवल्या आहेत, हेच माझं भाग्य!
कधीकधी जुन्या आठवणींनी माझं कापडही ओलावतं, जेव्हा मला आठवतं की कसं एखाद्या कठीण प्रसंगात मी संपूर्ण कुटुंबाची हक्काची ढाल बनले होते. आज जरी मला कोणी बाहेर फिरायला नेत नसलं, तरी कपाटाच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यातही मला एक वेगळाच अभिमान जाणवतो. कारण मला ठाऊक आहे, नव्या छत्र्या फॅशन म्हणून विकत घेतल्या जातील आणि विसरल्याही जातील; पण जेव्हा केव्हा घरातील माणसं एकत्र बसून जुन्या पावसाळ्याच्या गप्पा काढतील, तेव्हा माझ्याशिवाय त्यांच्या गप्पांना पूर्णताच येणार नाही. शेवटी रूप काळं असलं तरी मी कित्येक पिढ्यांचा गोड इतिहास माझ्या काळजात जपून ठेवला आहे, आणि हाच ऐतिहासिक वारसा मला आजही जिवंत ठेवतो.
प्रा. राजश्री पाटील
सुरत


0 टिप्पण्या