मनरेगा, पेसा, वित्त आयोगाच्या निधीतील कथित अनियमितता; जलजीवन मिशनची योजना अपूर्ण, ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर: माहूर तालुक्यातील पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चोरड ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी गंभीर तक्रारी केल्या असून, विविध विकासकामांतील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे, निधीचा गैरवापर आणि प्रशासकीय हलगर्जीपणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालय, माहूर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती माहूर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. मात्र, निवेदनाची दखल घेऊन ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना पुन्हा निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
मनरेगा व विकासकामे निकृष्ट; निधीच्या विनियोगावर प्रश्नचिन्ह
सन २०२४-२५ मध्ये मनरेगा अंतर्गत चोरड ते जुनापानी दरम्यान करण्यात आलेला सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता निकृष्ट दर्जाचा व अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच चोरड गावठाण ते बंडू शामराव आडे यांच्या शेतापर्यंतच्या खडीकरण रस्त्याच्या कामातही अनियमितता झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सन २०२१ ते २०२६ या कालावधीत पेसा, १४ वा व १५ वा वित्त आयोग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या विकासकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही कामे केवळ कागदोपत्री दाखवून निधी उचलण्यात आल्याची शक्यता असून, प्रत्यक्ष कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी व सरपंचांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप
ग्रामपंचायत अधिकारी श्री. सुंकावार हे नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नागरिकांशी उद्धटपणे वागणे आणि फोनद्वारे संपर्क साधल्यास प्रतिसाद न देणे, अशा तक्रारीही मांडण्यात आल्या आहेत.
सरपंच गोविंद राजाराम तारमेकवाड यांच्याविरोधातही नागरिकांच्या किरकोळ कामांसाठी ५०० ते १,००० रुपयांची लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जलजीवन मिशन योजना अपूर्ण; दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न
चोरड येथील जुनी पाणीपुरवठा योजना २००२ पासून बंद असल्याने ग्रामस्थांना तलावातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व पाइपलाइन उभारण्यात आली असली तरी योजना अद्याप कार्यान्वित झाली नसल्याचा आरोप आहे.
तलावाचे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, गरीब कुटुंबांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. या योजनेची तातडीने तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्राम रोजगार सेवक व सदस्याच्या राजीनाम्याचा प्रश्न
ग्राम रोजगार सेवक दलपत गोकुळ राठोड हे दोन वर्षांपासून पुणे येथे असल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार रिक्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभेत त्यांना पदावरून हटविण्याचा ठराव मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुढील कार्यवाही न झाल्याने नवीन ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती रखडल्याची तक्रार आहे.
याशिवाय ग्रामपंचायत सदस्या शशिकला बंडू आडे यांचा राजीनामा स्वीकारण्यास सरपंच टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारदारांचा सहभाग असलेली निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
तक्रारदारांनी सर्व विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी, मोजमाप पुस्तिका व देयकांची तपासणी, संबंधित अभिलेखांचे परीक्षण आणि दोषींविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. चौकशी पारदर्शक पद्धतीने करून तक्रारदारांना अहवालाची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी आहे.
“प्रशासनाने तक्रारींची तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा. अन्यथा १२ नोव्हेंबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल,” असा इशारा दत्ता बनीराम आडे, कुंदन विठ्ठल चव्हाण आणि विरेंद्र किशोर पवार यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आणि माहूर पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


0 टिप्पण्या